एज्रा ६:१-१२
१
म्हणून दारयावेश राजाने आज्ञा दिली की, जिथे कागदपत्रे राखून ठेवली जात त्या बाबेलच्या दप्तरखान्यात कसून शोध केला जावा.
२
शेवटी त्या चर्मपत्राची गुंडाळी मेदिया प्रांतातील अखमथा नगरातील राजवाड्यात सापडली, त्यात असे लिहिले होते: लेखात म्हटले होते:
३
कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी, यरुशलेम येथील परमेश्वराच्या मंदिरासंबंधी एक हुकूमनामा पाठविला गेला होता: तिथे अर्पणे करण्याकरिता ते मंदिर परत बांधले जावे आणि त्याची पायाभरणी करावी. त्याची उंची साठ हात व रुंदी साठ हात असावी.
४
पायांमध्ये मोठ्या दगडांचे तीन थर असतील व त्यांच्यावर एक लाकडाचा थर असेल. त्याचा सर्व खर्च राजकीय खजिन्यातून दिला जाईल;
५
आणि जी सोन्याचांदीची पात्रे नबुखद्नेस्सर राजाने परमेश्वराच्या मंदिरातून बाबेलला नेली होती, ती सर्व यरुशलेमला परत नेण्यात येतील व पूर्वीसारखी परमेश्वराच्या मंदिरात ठेवली जातील.
६
म्हणून फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाचे राज्यपाल ततनइ, शथर-बोजनइ आणि त्या प्रदेशाच्या इतर अधिकाऱ्यांना सांगण्यात येते की, या स्थानापासून दूर राहा.
७
परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामात अडथळे आणू नका. यहूदीयाचा राज्यपाल आणि इतर यहूदी पुढाऱ्यांनी पूर्वीच्याच जागेवर ते मंदिर बांधावे.
८
एवढेच नव्हे, तर परमेश्वराच्या मंदिराच्या बांधकामाकरिता यहूद्यांच्या मदतीसाठी हे करण्याची मी तुम्हाला आज्ञा देतो: मंदिर बांधण्यास येणारा सर्व खर्च फरात नदीच्या पलीकडील प्रदेशाच्या राजकीय खजिन्यातून त्यांच्या मागणीनुसार देण्यात यावा, जेणेकरून कामास विलंब होणार नाही.
९
स्वर्गातील परमेश्वराला होमार्पणे करण्यासाठी गोर्हे, मेंढरे व कोकरे द्यावीत, आणखी त्यांना गहू, द्राक्षारस, मीठ आणि जैतुनाचे तेल हे पदार्थ यरुशलेमातील याजकांच्या मागणीनुसार प्रत्येक दिवशी न चुकता द्यावेत.
१०
मग ते त्यांच्या स्वर्गातील परमेश्वराला मान्य होतील अशी अर्पणे देऊ शकतील आणि राजा व त्याच्या पुत्रांच्या कल्याणासाठी प्रार्थना करू शकतील.
११
कोणी या संदेशातील मजकूर कोणत्याही प्रकारे बदलण्याचा प्रयत्न करेल, तर त्याच्या घराच्या तुळया उपसून काढल्या जातील व त्या तुळयांवर त्याला फाशी देण्यात येईल आणि त्याच्या घराचा उकिरडा केला जाईल.
१२
ज्या परमेश्वराने त्यांच्या नावाचे वसतिस्थान व्हावे यासाठी यरुशलेम नगरी निवडली आहे, ते हा हुकूम बदलणार्या व मंदिराचा नाश करणार्या कोणत्याही राजाचा आणि लोकांचा सर्वनाश करतील. मी, दारयावेशने हे फर्मान काढले आहे व त्याची अंमलबजावणी तत्परतेने व्हावी.
Settings