Skip to content
दानीएल ६:५-१७

दानीएल ६:५-१७

५
शेवटी हे लोक म्हणाले, “आम्हाला दानीएलाविरुद्ध त्याच्या परमेश्वराच्या नियमाशिवाय कोणत्याही बाबतीत आरोपाचे कारण सापडणार नाही.”
६
तेव्हा अध्यक्ष आणि प्रांताधिकारी हे राजाकडे गेले आणि म्हणाले, “दारयावेश महाराज चिरायू होवोत!
७
आम्ही सर्वांनी म्हणजे अध्यक्ष, राज्यपाल, मंत्री नायब यांनी एकमताने ठरविले आहे की, महाराजांनी एक फर्मान काढावे व त्याचे पालन करण्यात यावे, त्यानुसार येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकावे.
८
तर आता महाराज, या फर्मानावर शिक्कामोर्तब करा आणि ते लिखित स्वरुपात द्या म्हणजे ते बदलता येणार नाही—म्हणजे मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”
९
तेव्हा दारयावेश राजाने या फर्मानावर सही केली.
१०
जेव्हा दानीएलला हे फर्मान निघाल्याचे समजले, तेव्हा तो घरी गेला व माडीवर खोलीत गेला. या खोलीच्या खिडक्या यरुशलेमच्या दिशेकडे उघडलेल्या होत्या. आपल्या नित्याच्या रिवाजाप्रमाणे दिवसातून तीन वेळा त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्याच्या परमेश्वराचे आभार मानले.
११
नंतर हे लोक त्याच्या घरी जमावाने आले आणि त्यांनी दानीएलला परमेश्वराला प्रार्थना करताना व मदत मागताना पाहिले.
१२
मग ते राजाकडे गेले आणि त्याच्यासोबत त्याच्या फर्मानाबद्दल बोलले: तुम्ही फर्मान काढले नाही काय की येणार्‍या तीस दिवसांमध्ये कोणीही, महाराजांऐवजी इतर कोणत्याही देवाकडे किंवा मनुष्याकडे प्रार्थना करेल, तर त्याला सिंहाच्या गुहेत टाकण्यात यावे? राजाने उत्तर दिले, “हे फर्मान कायम आहे—मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार जो रद्द करता येणार नाही.”
१३
नंतर ते राजाला म्हणाले, “महाराज, यहूदी कैद्यांपैकी दानीएल, तो आपली किंवा आपल्या फर्मानाची मुळीच पर्वा करीत नाही. तो आताही दिवसातून तीन वेळा प्रार्थना करतो.”
१४
जेव्हा राजाने हे ऐकले, तेव्हा तो फारच अस्वस्थ झाला; दानीएलला यातून वाचवावे असा त्याने निश्चय केला आणि त्याने सूर्यास्त होईपर्यंत दानीएलला कसे सोडवावे याचे सर्वतोपरी प्रयत्न केले.
१५
नंतर लोक जमावाने राजाकडे आले आणि त्यांना म्हटले, “महाराज, मेदिया व पारसीच्या कायद्यानुसार राजा जे फर्मान काढतो त्याला ते रद्द करता येणार नाही.”
१६
तेव्हा राजाने हुकूम दिला आणि दानीएलला सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला, “ज्या परमेश्वराची तू सतत सेवा करतोस ते तुझी सुटका करो!”
१७
आणि एक मोठी शिळा आणण्यात आली आणि गुहेच्या तोंडावर ठेवली व राजाने आपल्या स्वतःच्या आणि अधिकार्‍यांच्या मुद्रांनी शिक्कामोर्तब केले, जेणेकरून दानीएलच्या परिस्थितीत कोणताच बदल करता येऊ नये.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options