Skip to content
प्रेषित ४:८-२०

प्रेषित ४:८-२०

नंतर पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला: “अधिकारी आणि वडीलजनांनो!
या लंगड्या मनुष्याच्या बाबतीत दयाळूपणाचे जे कृत्य करण्यात आले व तो कसा बरा झाला याची जर आपण चौकशी करीत असाल,
१०
तर मला तुम्हाला आणि सर्व इस्राएली लोकांना सांगू द्या की, ज्या येशूंना तुम्ही क्रूसावर चढवून ठार मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुनः उठविले, त्याच नासरेथकर येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा मनुष्य येथे पूर्ण बरा होऊन तुमच्यासमोर उभा आहे.”
११
धर्मशास्त्रात याच येशूंबद्दल असे लिहिले आहे, “ ‘जो दगड बांधणार्‍यांनी नाकारला, तोच इमारतीचा कोनशिला झाला आहे.’
१२
तारण दुसर्‍या कोणामध्येही सापडणार नाही, कारण ज्या नावाने आपले तारण होईल, असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मानवजातीमध्ये दिलेले नाही.”
१३
त्यांनी पेत्र व योहान यांचे धैर्य पाहिले तेव्हा त्याचे त्यांना नवल वाटले आणि त्यांना कळून आले की ती अशिक्षित व सर्वसामान्य माणसे असून ते येशूंच्या सहवासात राहत होते.
१४
आणि त्या बरे झालेल्या मनुष्याला त्यांच्याजवळ उभे असलेले पाहून, त्यांच्याने काही बोलवेना.
१५
त्यावेळी त्यांनी त्यांना न्यायसभेच्या बाहेर जाण्यास सांगितले आणि एकत्र चर्चा केली.
१६
“आपण या मनुष्यांचे काय करावे?” ते म्हणाले, “यरुशलेमकरांना माहीत आहे की त्यांनी हा असाधारण चमत्कार करून दाखविला आहे आणि आम्ही हे नाकारू शकत नाही.
१७
तरी या गोष्टी लोकांमध्ये अधिक पसरू नये म्हणून आपण त्यांना अशी धमकी द्यावी की यापुढे त्यांनी या नावाने कोणाबरोबर काहीही बोलू नये.”
१८
तेव्हा त्यांनी त्यांना परत आत बोलाविले आणि येशूंच्या नावाने पुन्हा बोलू नये किंवा शिक्षण देऊ नये, अशी ताकीद दिली.
१९
परंतु पेत्र व योहानाने उत्तर दिले, “परमेश्वराच्या दृष्टीने काय योग्य आहेः तुमचे ऐकावे की त्यांचे? याचा न्याय तुम्हीच करा!
२०
ज्यागोष्टी आम्ही पाहिल्या आणि ऐकल्या आहेत, त्याबद्दल सांगण्याचे आम्ही थांबविणार नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options