1 शमुवेल २५:१८-३५
१८
तेव्हा अबीगईलने घाई केली. तिने दोनशे भाकरी, दोन बुधले द्राक्षारस, पाच मेंढरांचे शिजविलेले मांस, पाच सिआह भाजलेले धान्य, मनुक्यांच्या शंभर व अंजिराच्या दोनशे ढेपा घेऊन ते सर्व गाढवांवर लादले.
१९
आणि ती आपल्या सेवकांना म्हणाली, “तुम्ही पुढे जा; मी तुमच्यामागे येते.” परंतु तिने तिचा पती नाबाल याला काहीही सांगितले नाही.
२०
ती गाढवावर बसून डोंगराच्या ओढ्याकडून जात असताना, तिथे दावीद आणि त्याची माणसे तिच्या समोरून येत होती व ती त्यांना भेटली.
२१
दावीद नुकताच म्हणाला होता, “त्याचे काही हरवू नये म्हणून मी रानात या लोकांच्या मालमत्तेवर पहारा ठेवला, ते व्यर्थच गेले. त्याने मला चांगल्याची फेड वाईटाने केली आहे.
२२
उद्या सकाळपर्यंत त्याच्या लोकांपैकी मी एकही पुरुष जिवंत ठेवला तर परमेश्वर दावीदाचे तसेच किंवा त्यापेक्षा अधिक वाईट करो!”
२३
जेव्हा अबीगईलने दावीदाला पाहिले, तेव्हा ती घाईने गाढवावरून उतरली आणि तिने दावीदासमोर तोंड जमिनीकडे करून अभिवादन केले.
२४
ती त्याच्या पायावर पडली आणि म्हणाली, “माझ्या धन्या, आपल्या सेवकाच्या अपराधांची क्षमा करा, आणि मला तुमच्याशी बोलू द्या; तुमच्या दासीचे बोलणे ऐकून घ्या.
२५
माझ्या धन्या, तो दुष्ट मनुष्य नाबाल याच्याकडे लक्ष देऊ नका. तो त्याच्या नावाप्रमाणेच आहे, त्याच्या नावाचा अर्थ मूर्ख आहे आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे. परंतु ज्या पुरुषांना माझ्या धन्याने पाठवले त्यांना मी पाहिले नाही.”
२६
तर आता, माझ्या धन्या, याहवेह तुमच्या जिवंत परमेश्वराची व तुमची शपथ, याहवेहने तुम्हाला रक्तपातापासून आणि तुमच्या हातांना सूड घेण्यापासून आवरले आहे, तुमचे सर्व शत्रू आणि जे माझ्या धन्याला इजा आणू पाहतात ते नाबालाप्रमाणे होवो.
२७
आणि ही भेट, जी तुमच्या दासीने माझ्या धन्यासाठी आणली आहे ती तुमच्या बरोबरच्या माणसांना दिली जावो.
२८
“तुमच्या दासीच्या उद्धटपणाची कृपा करून क्षमा करा. याहवेह तुमचा परमेश्वर खचितच माझ्या धन्याचे राजघराणे कायमचे स्थापित करेल, कारण आपण याहवेहतर्फे युद्ध करत आहात आणि तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत तुमच्या ठायी दुष्टता आढळणार नाही.
२९
जरी कोणा मनुष्याने तुमचा जीव घेण्यासाठी तुमचा पाठलाग केला, तरी माझ्या धन्याचा जीव याहवेह तुमचा परमेश्वर यांच्याजवळ जिवंतांच्या गाठोड्यामध्ये सुरक्षित राहील, परंतु जसे गोफणीच्या झोळीतून फेकावे तसे याहवेह तुमच्या शत्रूंचे प्राण भिरकावून देतील.
३०
याहवेहने माझ्या धन्यासाठी जी चांगली अभिवचने दिली आहेत, ती प्रत्येक गोष्ट पूर्णतेस नेऊन आपणास इस्राएलवर अधिकारी म्हणून नेमल्यावर,
३१
माझ्या धन्याने विनाकारण रक्तपात केल्याविषयी किंवा सूड घेतल्याविषयी तुमच्या मनाला टोचणी लागणार नाही किंवा लटपटणारे ओझे असणार नाही. आणि जेव्हा याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला यश मिळवून देतील तेव्हा आपल्या दासीची आठवण करा.”
३२
दावीद अबीगईलला म्हणाला, “ज्यांनी तुला आज माझी भेट घेण्यासाठी पाठवले, ते याहवेह इस्राएलचे परमेश्वर धन्यवादित असोत.
३३
तुझ्या उत्तम निर्णयामुळे व तू मला आज रक्तपातापासून आणि माझ्या हाताने सूड घेण्यापासून दूर ठेवले त्यामुळे तू आशीर्वादित असो.
३४
नाहीतर जिवंत याहवेह इस्राएलचे परमेश्वर ज्यांनी मला तुझा नाश करण्यापासून आवरले त्यांची शपथ, जर तू त्वरा करून माझी भेट घेण्यास आली नसतीस तर पहाटेपर्यंत नाबालाचा एकही पुरुष जिवंत राहिला नसता.”
३५
नंतर तिने जे काही त्याच्यासाठी आणले होते ते तिच्या हातून दावीदाने स्वीकारले आणि म्हणाला, “शांतीने घरी जा. मी तुझे म्हणणे ऐकले आहे आणि तुझी विनंती मान्य केली आहे.”
Settings