Skip to content
1 शमुवेल १३:१-७

1 शमुवेल १३:१-७

शौल राजा झाला तेव्हा तो तीस वर्षांचा होता आणि त्याने बेचाळीस वर्षे इस्राएलवर राज्य केले.
शौलाने इस्राएलमधून तीन हजार पुरुष निवडले. दोन हजार त्याच्याजवळ मिकमाश येथे आणि बेथेलच्या डोंगराळ प्रदेशामध्ये होते आणि एक हजार बिन्यामीन प्रांतात गिबियाह येथे योनाथान बरोबर होते. बाकीच्या पुरुषांना त्याने आपआपल्या घरी पाठवून दिले.
गेबा येथील पलिष्ट्यांच्या ठाण्यावर योनाथानने हल्ला केला आणि पलिष्ट्यांनी याविषयी ऐकले. तेव्हा शौलाने संपूर्ण प्रदेशामधून रणशिंग वाजवित म्हटले, “इब्री लोकांनो, ऐका!”
तेव्हा इस्राएली लोकांनी ही बातमी ऐकली: “शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर हल्ला केला आहे आणि पलिष्ट्यांसमोर इस्राएली लोक घृणित ठरले.” म्हणून लोकांना गिलगाल येथे शौलाबरोबर येण्यासाठी बोलाविण्यात आले.
तीन हजार रथ, सहा हजार रथस्वार आणि समुद्र किनार्‍यावरील वाळूइतके असंख्य सैनिक बरोबर घेऊन पलिष्टी लोक इस्राएलशी युद्ध करण्यास एकत्र आले. त्यांनी मिकमाश येथे बेथ-आवेनच्या पूर्वेकडे आपला तळ दिला.
आपण पेचात पडलो आहोत आणि आपले सैन्य दबावात आहे असे जेव्हा इस्राएली लोकांनी पाहिले, तेव्हा ते गुहा आणि झुडूपे, खडक आणि कडे व विवरे यामध्ये लपले.
काही इब्री लोक तर यार्देनपासून गाद आणि गिलआदापलिकडे गेले. परंतु शौल गिलगालातच राहिला आणि जे लोक त्याच्याबरोबर होते ते भीतीने कंपित झाले होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options