1 राजे ६:१-१०
१
इस्राएली लोक इजिप्त देशातून बाहेर पडल्यावर चारशे ऐंशी वर्षानंतर, इस्राएलवर शलोमोनच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षात, दुसर्या महिन्यात; म्हणजेच सीव महिन्यात, शलोमोनने याहवेहचे मंदिर बांधण्यास सुरुवात केली.
२
शलोमोन राजाने याहवेहसाठी जे मंदिर बांधले, त्याची लांबी साठ हात, रुंदी वीस हात आणि उंची तीस हात होती.
३
मंदिराच्या मुख्य मंडपाच्या समोरच्या वर्हांड्याची रुंदी मंदिराच्या रुंदीएवढीच, म्हणजेच वीस हात होती, मंदिराच्या समोरील बाजूने त्याची रुंदी दहा हात होती.
४
त्यांनी मंदिराच्या वरील बाजूच्या भिंतींमध्ये अरुंद खिडक्या बनविल्या.
५
मुख्य खोली तसेच पवित्रस्थानाच्या आतील बाजूस त्याने मजले बांधले व त्यात खोल्या केल्या.
६
सर्वात खालचा मजला पाच हात रुंद, मधला मजला सहा हात आणि तिसरा मजला सात हात. त्याने मंदिराच्या बाहेरील बाजूस तोडे ठेवले म्हणजे मंदिराच्या भिंतींच्या पार काहीही घुसविले जावू नये.
७
मंदिराच्या बांधकामासाठी खाणीतूनच तयार केलेले दगड वापरण्यात आले होते आणि मंदिर बांधले जात असताना हातोडी, कुर्हाड किंवा इतर कोणत्याही लोखंडी हत्याराचा आवाज मंदिराच्या परिसरात ऐकू आला नव्हता.
८
तळमजल्याचे प्रवेशद्वार मंदिराच्या दक्षिणेस होते; तिथून मधल्या मजल्यापर्यंत आणि तिथून पुढे तिसर्या मजल्यापर्यंत एक जिना होता.
९
त्याने गंधसरूच्या लाकडाच्या तुळया टाकून छप्पर टाकून, मंदिराचे बांधकाम पूर्ण केले.
१०
आणि त्याने मंदिराच्या सभोवतीच्या बाजूने पाच हात उंचीच्या खोल्या बांधल्या व त्या प्रत्येक खोली गंधसरूच्या तुळयांनी मंदिराशी जोडली.
Settings