1 राजे ५:१-१४
१
त्याचे पिता दावीदाचा अभिषिक्त वारस म्हणून शलोमोनचा राज्याभिषेक झाला आहे असे जेव्हा सोरचा राजा हीरामाने ऐकले, तेव्हा त्याने शलोमोनकडे आपले राजदूत पाठवले, कारण दावीदाशी त्याचे नेहमीच मैत्रीचे संबंध होते.
२
शलोमोनने हीरामास परत निरोप पाठवला:
३
“आपणास तर माहीतच आहे की माझे पिता दावीदाला सर्व बाजूंनी युद्धाने घेरले होते आणि त्याच्या शत्रूंना याहवेहने त्याच्या पायाखाली देईपर्यंत याहवेह त्यांच्या परमेश्वराच्या नावासाठी त्यांना मंदिर बांधता आले नाही.
४
परंतु आता माझ्या याहवेह परमेश्वराने सर्व बाजूंनी मला स्वस्थता दिली आहे. कोणी शत्रू किंवा अरिष्ट नाही.
५
जसे याहवेहने माझे पिता दावीदाला सांगितले होते, ‘तुझा पुत्र, ज्याला मी तुझ्या जागी तुझ्या राजासनावर बसवेन तो माझ्या नावासाठी मंदिर बांधेल.’ म्हणून याहवेह माझ्या परमेश्वराच्या नावासाठी मी मंदिर बांधावे अशी मी इच्छा बाळगतो.
६
“तर आता लबानोनचे गंधसरू माझ्यासाठी कापले जावे अशी आज्ञा करा. माझी माणसे तुमच्या माणसांबरोबर काम करतील आणि तुमच्या माणसांसाठी तुम्ही जी मजुरी ठरवाल ती मी तुम्हाला देईन. तुम्हाला माहीतच आहे की लाकडाचे काम करण्यात जी निपुणता सीदोनी लोकांमध्ये आहे ती आमच्यात कोणामध्ये नाही.”
७
शलोमोनचा निरोप ऐकून हीरामाला अतिशय आनंद झाला व म्हणाला, “आज याहवेहची स्तुती असो, कारण या महान देशावर राज्य करण्यासाठी याहवेहने दावीदाला ज्ञानी पुत्र दिला आहे.”
८
तेव्हा हीरामाने शलोमोनला निरोप पाठवला: “आपण पाठविलेला निरोप मला मिळाला. देवदारू व गंधसरूच्या लाकडाचा पुरवठा आपल्या मागणीनुसार पुरविला जाईल.
९
माझी माणसे ती लबानोनपासून भूमध्य समुद्रापर्यंत ओढून नेतील, मी त्यांचे ताफे बनवून जे ठिकाण आपण मला सांगाल तिथपर्यंत पोचते करेन. तिथे मी ते वेगळे करेन आणि मग आपण ते घेऊन जाऊ शकता. आणि माझ्या राजकीय घराण्याला आपण अन्न पुरवावे ही माझी इच्छा आपण पूर्ण करावी.”
१०
याप्रकारे हीरामाने शलोमोनला हवे तेवढ्या गंधसरू आणि देवदारू लाकडांचा पुरवठा केला.
११
आणि शलोमोनने हीरामाला त्याच्या घराण्यासाठी अन्न म्हणून वीस हजार कोर गहू, त्याचबरोबर वीस हजार कोर दाबून काढलेले जैतुनाचे तेल दिले. याप्रकारे शलोमोन वर्षानुवर्षे ते पाठवित राहिला.
१२
अभिवचन दिल्याप्रमाणे याहवेहने शलोमोनला ज्ञान दिले. हीराम आणि शलोमोन यांच्यात शांतीचे संबंध होते आणि त्या दोघांनी शांतीचा करार केला.
१३
शलोमोन राजाने सर्व इस्राएलातून तीस हजार पुरुष मजूर घेतले,
१४
शलोमोन लबानोनला प्रत्येक महिन्याला दहा हजार पुरुष आळीपाळीने पाठवित असे, म्हणजे ते लबानोनमध्ये एक महिना व दोन महिने आपल्या घरी राहत असत. अदोनिराम बिगारी कामकर्यांवर अधिकारी होता.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings