Birthright बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
एकदा याकोब वरण शिजवित असताना एसाव शिकारीहून खूप थकूनभागून आला.
तो याकोबाला म्हणाला, “लवकर, मला तो तांबडा पदार्थ घेऊ दे! मला भयंकर भूक लागली आहे!” (म्हणूनच त्याला एदोम असेही म्हणतात.)
याकोबाने उत्तर दिले, “प्रथम तुझा ज्येष्ठत्वाचा हक्क मला दे.”
एसाव म्हणाला, “एखादा मनुष्य भुकेने मरत असताना त्याला त्याच्या ज्येष्ठत्वाच्या हक्काचा काय उपयोग?”
परंतु याकोब म्हणाला, “आधी शपथ घे.” म्हणून त्याने शपथ घेतली आणि आपला ज्येष्ठ पुत्रत्वाचा हक्क याकोबाला मोबदला म्हणून दिला.
तेव्हा याकोबाने एसावाला भाकर व मसुरीच्या डाळीचे वरण दिले; एसावाने ते खाल्ले आणि निघून गेला. अशा रीतीने एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा हक्क तुच्छ मानला.
एखाद्या मनुष्याला दोन पत्नी असतील व तो एकीवर प्रीती करीत असेल व दुसरीवर करीत नसेल आणि त्या दोघींनाही त्याच्यापासून पुत्र झाले असतील आणि जी त्याला प्रिय नाही तिचा पुत्र ज्येष्ठ असेल,
तर जेव्हा तो आपल्या पुत्रांना आपली संपत्ती त्याचे वतन म्हणून वाटून देईल, तेव्हा जो खरा ज्येष्ठपुत्र असून नावडत्या पत्नीचा पुत्र आहे, त्याला डावलून, धाकट्या पुत्राला, जो त्याच्या आवडत्या पत्नीचा आहे, त्याला आपल्या प्रथम पुत्राचा अधिकार देऊ नये.
आपल्या परंपरेप्रमाणे त्याने आपल्या सर्वात ज्येष्ठ पुत्राला दुप्पट वाटा द्यावा, कारण तो त्याच्या पौरुषाचे प्रथमफळ आहे. तो जरी नावडत्या पत्नीचा पुत्र असला, तरीही ज्येष्ठ पुत्राचा हक्क त्याचाच आहे.
रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही.
जरी यहूदाह त्याच्या बंधूतील सर्वात शक्तिमान होता आणि यहूदाहच्या वंशातूनच एक राज्यकर्ता उदयास आला, तरी योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला.
कृत्याने नव्हे तर पाचारण देणार्याने असे रिबेकाहला सांगितले होते, “मोठा लहान्याची सेवा करेल.”
जसे शास्त्रलेखात लिहिले आहे: “मी याकोबावर प्रीती केली, परंतु मी एसावाचा द्वेष केला.”