इब्री१३
Listen to this chapter
0:00
0:00
ख्रिस्ती जीवनातील व्यवहार्य कर्तव्ये
१
बंधुप्रीतिमध्ये जडून राहा.
२
अपरिचितांचे आदरातिथ्य करण्यास विसरू नका, कारण असे करताना काहींनी नकळत देवदूतांचा पाहुणचार केला आहे.
३
तुरुंगात असलेल्यांची सतत आठवण ठेवा, जणू काही आपण स्वतः तुरुंगात आहोत असे समजून त्यांच्याबरोबर दुःख सहन करा. छळ होणार्यांसह तुमचाही छळ होत आहे असे समजून त्यांच्या दुःखात वाटेकरी व्हा.
४
विवाह सर्वांना सन्मान्य असावा आणि वैवाहिक अंथरूण पवित्र राखावे, कारण व्यभिचार करणारे अथवा जारकर्म करणार्यांचा न्याय परमेश्वर स्वतः करेल.
प्रभू माझा साहाय्यकर्ता
५
द्रव्यलोभापासून दूर राहा; जवळ असेल तेवढ्यात तुम्ही समाधानी असावे. कारण परमेश्वराने म्हटले आहे, “मी तुला कधीच सोडणार नाही व तुला कधीच टाकणार नाही.”
६
म्हणूनच आत्मविश्वासाने आपल्याला म्हणता येते: “प्रभू माझे सहायक आहेत; मला कशाचेही भय वाटणार नाही. नश्वर मानव मला काय करणार?”
विश्वासू पुढाऱ्यांचे अनुकरण
७
तुम्हाला परमेश्वराचे वचन शिकविणार्या तुमच्या वडीलजनांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनचरित्राचा परिणाम बघून त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
८
येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखेच आहेत.
९
म्हणून कोणत्याही प्रकारच्या अनोळखी शिक्षणाच्या आहारी जाऊ नका. जे खाऊन खाणार्याचा जीवनाला काहीच फायदा होत नाही असे विधिविषयक विशिष्ट पदार्थ खाण्याने नव्हे, तर तुमचे अंतःकरण कृपेने बळकट करणे चांगले आहे.
छावणीबाहेरील बलिदान
१०
आपली एक वेदी आहे, तेथील काही खाण्याचा, मंडपात जे सेवा करतात त्यांना अधिकार नाही.
११
वधलेल्या पशूंचे रक्त पापार्पण म्हणून महायाजक नियमानुसार परमपवित्रस्थानात नेत असत व नंतर त्या पशूंची शरीरे छावणीबाहेर जाळून टाकीत.
१२
लोकांना त्याच्या रक्ताने पवित्र करण्यासाठीच येशूंनी शहराच्या वेशीबाहेर जाऊन दुःख सहन केले.
१३
तेव्हा आपणही त्याच्याकडे, त्याने सहन केलेला अपमान घेऊन छावणीच्या बाहेर जाऊ या.
१४
आपण तर स्वर्गातील भावी नगराची वाट पाहत आहोत, कारण आपल्याला या जगात स्थायी नगर नाही.
१५
तेव्हा आपण येशूंच्या साहाय्याने परमेश्वराला आपल्या स्तुतीचा यज्ञ—त्यांच्या नावाचे गौरव करणारे आपले मुखफल सतत अर्पण करू या.
१६
चांगले कार्य करण्यात आणि आपल्याजवळ जे आहे त्यात गरजवंतांना भागीदार करण्यास विसरू नका, कारण असे यज्ञ परमेश्वराला फार संतोष देतात.
१७
आपल्या पुढार्यांवर भरवसा ठेवा व त्यांच्या अधीन राहा, कारण ते तुमच्यावर नजर ठेवतात आणि तुमच्याविषयी त्यांना प्रभूला हिशोब द्यावा लागतो. अशाने त्यांचे काम आनंदाचे होईल व त्यांना ते ओझे वाटणार नाही, ज्याचा तुम्हाला काहीही लाभ नाही.
प्रार्थना आणि पुनर्स्थापनेसाठी विनंती
१८
आमच्यासाठी प्रार्थना करा. कारण आमची खात्री आहे की आमची विवेकबुद्धी स्वच्छ आहे व सर्व बाबतीत सन्मानाने जगण्याची आमची इच्छा आहे.
१९
तुमच्याकडे मी लवकर परत यावे म्हणून मला तुमच्या प्रार्थनेची विशेष गरज आहे.
स्तोत्र आणि आशीर्वाद
२०
आता ज्या शांतीच्या परमेश्वराने, सार्वकालिक कराराच्या रक्ताने, आपले प्रभू येशू, जे मेंढरांचे महान मेंढपाळ आहेत,
२१
यांना मेलेल्यातून माघारी आणले, ते परमेश्वर त्यांच्या दृष्टीने जे योग्य ते आपल्यामध्ये येशू ख्रिस्ताद्वारे करोत व प्रत्येक कामात त्यांना संतोषविण्यास तुम्हाला सिद्ध करो. त्यांना सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
२२
बंधू व भगिनींनो, माझे उपदेशाचे शब्द कृपा करून ऐकून घ्या, खरेतर हे पत्र मी थोडक्यातच लिहिले आहे.
२३
बंधू तीमथ्य हा आता तुरुंगातून सुटला आहे, हे तुम्हाला माहीत असावे, अशी माझी इच्छा आहे; तो इकडे लवकर आला, तर त्याला बरोबर घेऊन मी तुमच्या भेटीस येईन.
२४
मंडळीतील तुमच्या सर्व वडीलजनांस व तेथील इतर पवित्र जणांना माझ्या शुभेच्छा सांगा. माझ्याबरोबर येथे इटलीमध्ये असलेले विश्वासणारे बांधव तुम्हाला शुभेच्छा सांगतात.
२५
तुम्हा सर्वांवर परमेश्वराची कृपा असो.
Use ← → arrow keys to navigate
Settings
Reading Style
Typeface
Font Size px
Reading Width chars
Options
Study Note