Skip to content

1 तीमथ्य

अध्यक्षांच्या पात्रता

हे वचन विश्वासयोग्य आहे की जर कोणी अध्यक्ष होण्याची इच्छा धरतो, तर तो उत्तम कामाची इच्छा बाळगतो.
तर अध्यक्ष निर्दोष, एका पत्नीचा पती असावा, सौम्य, सावधान, आदरणीय, अतिथिप्रिय आणि शिकविण्यात निपुण असावा.
तो मद्यपी अथवा भांडखोर नसावा, तर तो सौम्य व दयाळू असावा, तो पैशावर प्रीती करणारा नसावा.
तो आपल्या घरावर उत्तम अधिकार चालविणारा, त्याने आपल्या लेकरांना आज्ञाधारक ठेवावे आणि हे सर्व आदरयुक्तरितीने करावे.
(ज्याला आपल्या कुटुंबाची व्यवस्था चांगली ठेवता येत नाही, तर तो परमेश्वराच्या मंडळीचा सांभाळ कसा करेल?)
अध्यक्ष नव्याने ख्रिस्ती झालेला नसावा, नाही तर तो गर्वाने फुगून जाऊन सैतानाच्या दंडाचा भागीदार होईल.
तसेच मंडळीच्या बाहेरील लोकांचेही त्याच्याविषयी चांगले मत असावे, जेणेकरून त्याची निंदा होऊ नये आणि सैतानाच्या फासात तो पडू नये.

सेवकांच्या पात्रता

मंडळीतील सेवकही आदरयोग्य व निष्कपट असावेत. ते मद्यपान करणारे नसावे व अप्रामाणिकपणे पैसा मिळविणारे नसावे.
ते विश्वासाचे गुप्त सत्य शुद्ध विवेकबुद्धीने राखणारे असावेत.
१०
आणि त्यांची प्रथम चाचणी करणे आवश्यक आहे; नंतर निर्दोष ठरल्यास त्यांनी सेवक म्हणून काम करावे.
११
त्याचप्रमाणे, त्यांच्या पत्नीदेखील आदरणीय असाव्यात. त्या निंदानालस्ती करणार्‍या असू नयेत, तर त्या नेमस्त व सर्व गोष्टींविषयी विश्वासू असाव्यात.
१२
सेवक एका पत्नीचा पती असावा आणि तो आपल्या मुलांची व कुटुंबाची व्यवस्था उत्तम प्रकारे घेणारा असावा.
१३
ज्यांनी सेवकपणाची सेवा चांगली केली, त्यांना मान मिळतो आणि ख्रिस्त येशूंवरील त्यांची विश्वासात दृढता वाढते.
१४
तुझ्याकडे लवकरच येण्याची आशा असूनही, या सर्वगोष्टी मी आताच तुला लिहित आहे,

मंडळी आणि सुभक्तीचे रहस्य

१५
जर माझे येणे थोडेसे लांबले, तर परमेश्वराचे घर म्हणजे जिवंत परमेश्वराची मंडळी जी सत्याचा खांब व आधारस्तंभ आहे, त्या परमेश्वराच्या घरात कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
१६
सुभक्तीचे रहस्य निर्विवाद गंभीर आहे: परमेश्वर मानव शरीरात प्रकट झाले, आत्म्यात नीतिमान ठरले; देवदूतांच्या पाहण्यात आले, राष्ट्रांमध्ये गाजविले गेले, जगात त्यांच्यावर विश्वास ठेवण्यात आला आणि गौरवात पुन्हा वर घेतले गेले.
Use arrow keys to navigate
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options