Skip to content
मार्क ९:३२-५०

मार्क ९:३२-५०

३२
परंतु ते काय म्हणतात हे ते समजले नाहीत आणि त्या गोष्टींविषयी विचारण्याची त्यांना भीती वाटली.
३३
मग ते कफर्णहूमात आले. घरात गेल्यानंतर येशूने त्यांना विचारले, “तुम्ही रस्त्यात कशाविषयी चर्चा करीत होता?”
३४
परंतु शिष्य शांत राहिले कारण मार्गावर असताना आपल्यापैकी सर्वात श्रेष्ठ कोण यासंबंधी शिष्यांचा वादविवाद सुरू झाला होता.
३५
ते खाली बसले, त्यांनी आपल्या बारा शिष्यांना बोलाविले आणि म्हणाले, “तुमच्यामध्ये जो कोणी प्रथम होऊ पाहतो, त्याने सर्वात शेवटचा, आणि सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
३६
मग त्यांनी एका लहान लेकराला त्यांच्यामध्ये ठेवले. मग त्या लेकराला कवेत उचलून घेत त्यांना म्हणाले,
३७
“जो कोणी माझ्या नावाने अशा लहान बालकाचा स्वीकार करतो, तो माझा स्वीकार करतो आणि जो कोणी माझा स्वीकार करतो, तो माझा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याचा स्वीकार करतो.”
३८
योहान म्हणाला, “गुरुजी, आम्ही कोणा एकाला तुमच्या नावाने भुते काढताना पाहिले. आम्ही त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला, कारण तो आपल्यातील नव्हता.”
३९
येशू म्हणाले, “त्याला मना करू नका, कारण जो माझ्या नावाने चमत्कार करतो तो कोणीही असला, तरी तो लगेचच माझ्याविरुद्ध वाईट बोलणार नाही.
४०
कारण जो आपल्याविरुद्ध नाही, तो आपल्या बाजूचा आहे.
४१
मी तुम्हाला निश्चित सांगतो, तुम्ही ख्रिस्ताचे आहात म्हणून माझ्या नावाने कोणी तुम्हाला पेलाभर पाणी दिले, तर तो आपल्या पारितोषिकाला मुकणार नाही.
४२
“जर कोणी माझ्यावर विश्वास ठेवणार्‍या या लहानातील एकालाही अडखळण करण्यास प्रवृत्त करतो, त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्याला सरोवरात फेकून द्यावे हे त्याच्या चांगल्यासाठी होईल.
४३
जर तुझा हात अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन हात असून नरकात जावे व न विझणार्‍या अग्नीत जाण्याऐवजी एका हाताने अधू होऊन जीवनात प्रवेश करणे अधिक हिताचे होईल.”
४४
ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.
४५
जर तुझा पाय अडखळण करीत असेल, तर तो कापून टाक. दोन पाय असून नरकात टाकले जावे, यापेक्षा एका पायाने अपंग होऊन जीवनात प्रवेश करणे हे तुझ्या हिताचे आहे.
४६
ज्या ठिकाणी त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.
४७
जर तुझा डोळा तुला अडखळण करीत असेल, तर तो उपटून फेकून दे. दोन डोळ्यांसह अग्नीच्या नरकात जाण्यापेक्षा एका डोळ्याने परमेश्वराच्या राज्यात प्रवेश करणे हे उत्तम आहे.
४८
ज्या ठिकाणी, “ ‘त्यांना खाणारे किडे कधी मरत नाहीत, किंवा तेथील अग्नी कधी विझत नाही.’
४९
प्रत्येकजण अग्नीद्वारे खारट केले जातील.
५०
“मीठ चांगले आहे, पण मिठाचा खारटपणा गेला तर त्याचा खारटपणा कशाने आणाल? तुमच्यातील मीठ गमावू नका, एकमेकांशी शांतीने राहा.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options