मार्क १४:१-१५
१
वल्हांडण आणि बेखमीर भाकरीचा सण यांना दोनच दिवसांचा अवधी होता आणि प्रमुख याजकवर्ग आणि नियमशास्त्र शिक्षक, येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधत होते.
२
ते म्हणाले, “आपण हे सणाच्या समयी करू नये, कारण तसे केले तर लोक कदाचित दंगल करतील.”
३
येशू बेथानी येथे असताना, “कुष्ठरोगी शिमोन,” याच्या घरी भोजनास बसले होते, त्यावेळी एक स्त्री, शुद्ध जटामांसीपासून बनविलेले अतिशय मोलवान सुगंधी तेल असलेली एक अलाबास्त्र कुपी घेऊन आत आली आणि तिने ती कुपी फोडून येशूंच्या मस्तकावर ओतली.
४
तिथे हजर असलेल्यांपैकी काहीजण एकमेकांना संतापाने म्हणत होते, “तेलाची ही नासाडी कशाला?
५
एका वर्षाच्या मजुरीपेक्षाही अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” आणि त्यांनी कठोरपणे तिचा निषेध केला.
६
“तिच्या वाटेस जाऊ नका,” येशू त्यांना म्हणाले, “तुम्ही तिला त्रास का देता? तिने माझ्यासाठी एक सुंदर कृत्य केले आहे.
७
गरीब लोक तर नेहमीच तुमच्याबरोबर असतील. तुम्हाला पाहिजे तेव्हा त्यांना मदत करता येईल. पण मी तुमच्याबरोबर नेहमीच असणार नाही.
८
तिला जे करता आले, ते तिने केले. माझ्या अंत्यसंस्कारासाठी तिने माझ्या शरीरावर आधी सुगंधी तेल ओतले आहे.
९
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जगात जिथे कुठे शुभवार्ता गाजविण्यात येईल, तिथे हिने केलेले हे सत्कार्य हिच्या आठवणीसाठी सांगितले जाईल.”
१०
नंतर बारा शिष्यांपैकी एक, यहूदाह इस्कर्योत येशूंना विश्वासघाताने धरून देण्यास महायाजकांकडे गेला.
११
तेव्हा त्यांना आनंद झाला आणि त्याला मोबदला देण्याचे त्यांनी वचन दिले. मग तो येशूंना त्यांच्या हातात धरून देण्याची योग्य संधी शोधू लागला.
१२
बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी, म्हणजे रीतीप्रमाणे ज्या दिवशी वल्हांडणाच्या कोकर्याचा यज्ञ करत असत, येशूंच्या शिष्यांनी त्यांना विचारले, “वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कुठे करावी अशी आपली इच्छा आहे?”
१३
तेव्हा येशूंनी त्यांच्या शिष्यांपैकी दोघांना पाठविले आणि सांगितले, “तुम्ही शहरात जा आणि एक मनुष्य पाण्याने भरलेली मोठी घागर घेऊन जात असलेला तुम्हाला भेटेल, त्याच्यामागे जा.
१४
तो ज्या घरात जाईल त्या घराच्या मालकाला सांगा, ‘गुरुजी विचारत आहेत की, ज्या खोलीत मला माझ्या शिष्यांबरोबर वल्हांडणाचे भोजन करता येईल, ती पाहुण्यांची खोली कुठे आहे?’
१५
तो तुम्हाला माडीवरील मोठी तयार व सुसज्ज असलेली एक खोली दाखवेल. तिथे आपल्यासाठी तयारी करा.”
Settings