लूक २३:१३-२५
१३
नंतर पिलाताने प्रमुख याजक, अधिकारी आणि लोक यांना एकत्र बोलावून म्हटले,
१४
“तुम्ही या मनुष्याला, तो लोकांना बंड करावयास चिथावीतो म्हणून माझ्याकडे आणले. मी त्याची तुमच्यासमोर कसून चौकशी केली आणि तो निर्दोष आहे, असे मला आढळून आले.
१५
हेरोदाचा निर्णय देखील असाच आहे, म्हणूनच त्याने याला आमच्याकडे परत पाठविले आहे. मरणदंडाची शिक्षा व्हावी असे या मनुष्याने काहीही केलेले नाही.
१६
म्हणून मी याला फटके मारतो आणि नंतर त्याला सोडून देतो.”
१७
कारण या सणात त्यांच्यासाठी त्याला एका गुन्हेगाराला सोडावे लागत असे.
१८
परंतु गर्दीतील सर्व लोक ओरडून म्हणाले, “याला जिवे मारा आणि आमच्यासाठी बरब्बाला सोडा.”
१९
बरब्बाला त्यावेळी शहरामध्ये उठाव करणे व खून करणे यासाठी तुरुंगात ठेवले होते.
२०
येशूंना सोडून देण्याची पिलाताची इच्छा होती, म्हणून तो त्यांच्याशी वाद घालू लागला
२१
पण लोक ओरडतच राहिले, “त्याला क्रूसावर खिळा! त्याला क्रूसावर खिळा!”
२२
तरीही आणखी एकदा तिसर्या खेपेस पिलाताने खुलासा विचारला, “या मनुष्याने कोणता गुन्हा केला आहे? त्याला क्रूसखांबावर खिळावे असा कोणताही दोष त्याच्यामध्ये मला आढळला नाही, मी त्याला फटके मारून सोडून देतो.”
२३
परंतु येशूंना क्रूसावर खिळण्याची मागणी करीत, ते ओरडू लागले, शेवटी त्यांचे ओरडणे सफल झाले,
२४
आणि पिलाताने त्यांची मागणी मान्य करण्याचे ठरविले.
२५
तसेच त्यांच्या मागणीप्रमाणे, बंडाळी आणि खून करण्याच्या आरोपावरून तुरुंगात असलेला बरब्बाला सोडून दिले आणि येशूंना क्रूसावर खिळावे म्हणून त्यांच्या स्वाधीन केले.
Settings