लूक २२:४०-५३
४०
तिथे पोहोचल्यावर, ते शिष्यांना म्हणाले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
४१
नंतर ते त्यांच्यापासून सुमारे दगड फेकला जाईल इतक्या अंतरावर गेले, त्यांनी गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.
४२
“हे पित्या, जर तुमची इच्छा असेल, तर हा प्याला माझ्यापासून दूर करा; तरी माझी इच्छा नाही तर तुमची पूर्ण होऊ द्या.”
४३
तेव्हा स्वर्गातून एक देवदूत त्यांच्यापुढे प्रकट झाला आणि त्यांना सामर्थ्य पुरविले.
४४
येशू आत्म्यामध्ये इतके व्याकूळ झाले की, त्यांनी अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्यांचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता.
४५
शेवटी प्रार्थना करून उठल्यानंतर, ते आपल्या शिष्यांकडे परत आले, पण तेही दुःखामुळे झोपी गेले होते असे त्यांना आढळले.
४६
“तुम्ही झोप का घेत आहात?” येशू त्यांना म्हणाले, “उठा, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
४७
ते बोलत असतानाच लोकांचा मोठा जमाव तिथे आला आणि येशूंच्या बारा शिष्यांपैकी एक, ज्याला यहूदाह म्हणत होते तो त्यांना मार्ग दाखवित होता. तो येशूंचे चुंबन घ्यावयास जवळ आला,
४८
तेव्हा येशूने त्याला विचारले, “यहूदा, चुंबन घेऊन तू मानवपुत्राचा विश्वासघात करतो काय?”
४९
आता काय होणार हे शिष्यांनी ओळखले आणि येशूंना विचारले, “प्रभूजी, आम्ही तरवार चालवावी काय?”
५०
तेवढ्यात त्यांच्यातील एकाने महायाजकाच्या दासावर वार करून त्याचा उजवा कान कापून टाकला.
५१
येशूंनी शिष्यांना म्हटले, “पुरे करा.” आणि त्यांनी त्या मनुष्याचा कान स्पर्श करून बरा केला.
५२
नंतर मुख्य याजक, मंदिराच्या द्वारपालांचे अधिकारी आणि वडीलजन यांना येशूंनी म्हटले, “मी बंडखोरांचा नेता आहे काय की तुम्ही तरवारी व लाठ्या घेऊन आला आहात?
५३
मी दररोज मंदिराच्या परिसरात तुमच्याबरोबर होतो, पण त्यावेळी तुम्ही मला धरले नाही. परंतु आता हीच तुमची वेळ आहे, येथे अंधाराची सत्ता आहे.”
Settings