योहान १६:१९-३३
१९
त्यांना याविषयी काही विचारायचे आहे हे ओळखून येशूंनी त्यांना म्हटले, “मी तुम्हाला जे सांगितले होते, त्याबद्दल तुम्ही एकमेकांना विचारत आहात काय की ‘थोड्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोड्या वेळाने तुम्ही मला पाहाल.’
२०
मी तुम्हाला निश्चित सांगतो की, जग आनंद करेल पण तुम्ही रडाल व शोक कराल. तुम्ही दुःख कराल परंतु तुमच्या दुःखाचे रूपांतर आनंदात होईल.
२१
जी स्त्री बाळाला जन्म देते तिला वेदना होतात कारण तिची वेळ आलेली असते; परंतु जेव्हा तिचे बाळ जन्मास येते तेव्हा ती तिच्या बाळाला या जगात जन्मलेले पाहून आनंद करते व सर्व यातना विसरून जाते.
२२
त्याच प्रकारे आता दुःख करण्याची तुमची वेळ आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा भेटेन तेव्हा तुमचे हृदय आनंदी होईल आणि तुमचा आनंद तुमच्यापासून कोणीही हिरावून घेणार नाही.
२३
त्या दिवशी तुम्ही माझ्याजवळ काही मागणार नाही. मी तुम्हाला खरोखर सांगतो की, तुम्ही जे काही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते तो तुम्हाला देईल.
२४
आतापर्यंत तुम्ही माझ्या नावाने काही मागितले नाही. माझ्या नावाने मागा म्हणजे मिळेल आणि तुमचा आनंद पूर्ण होईल.
२५
“जरी मी अलंकारिक रीतीने बोलत आहे, तरी अशी वेळ येईल की मी तुम्हाबरोबर अशा भाषेमध्ये आणखी बोलणार नाही, तर पित्याविषयी तुम्हाला स्पष्टरीतीने सांगेन.
२६
त्या दिवसात तुम्ही माझ्या नावाने मागाल. मी असे म्हणत नाही की मी तुमच्यावतीने पित्याजवळ मागेन.
२७
नाही, पिता स्वतःही तुमच्यावर प्रीती करतात, कारण तुम्ही मजवर प्रीती केली व मी परमेश्वरापासून आलो आहे असा विश्वास ठेवला.
२८
मी पित्यापासून आलो आणि या जगात प्रवेश केला आणि मी हे जग सोडून पित्याकडे परत जात आहे.”
२९
तेव्हा येशूंचे शिष्य म्हणाले, “पाहा, आता तुम्ही स्पष्ट बोलत आहात, अलंकारिक भाषेत काही सांगत नाही.
३०
आता आम्हास कळले की, तुम्हाला सर्वगोष्टी ठाऊक आहेत, म्हणून कोणासही आपणास प्रश्न विचारण्याची गरज नाही. यावरून आपण परमेश्वरापासून आला आहात असा आम्ही विश्वास ठेवतो.”
३१
येशूंनी उत्तर दिले, “आता तुम्ही विश्वास ठेवता काय?
३२
अशी वेळ येत आहे आणि आलीच आहे की तुमची पांगापांग होईल व तुम्ही प्रत्येकजण आपआपल्या घरी परत जाल. तुम्ही मला एकटे सोडाल, तरीसुद्धा मी एकटा नसेन, कारण माझे पिता मजबरोबर आहेत.
३३
“मी या सर्वगोष्टी तुम्हाला सांगितल्या, ते यासाठी की माझ्यामध्ये तुम्हाला शांती मिळावी. या जगात तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. परंतु धीर धरा! कारण मी जगावर विजय मिळविला आहे.”
Settings