Skip to content
यिर्मयाह ३२:२६-४४

यिर्मयाह ३२:२६-४४

२६
नंतर यिर्मयाहला याहवेहचे पुढील वचन आले:
२७
“मी, याहवेह, अखिल मानवजातीचा परमेश्वर आहे. मला कोणतीही गोष्ट करणे अवघड आहे का?
२८
म्हणून याहवेह असे म्हणतात: मी हे नगर बाबिलोनचे लोक व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देणार आहे, जो ते हस्तगत करेल.
२९
हल्ला करणारे बाबिलोनचे सैनिक आत शिरतील, आणि शहराला आग लावतील. माझा संताप चेतविण्यासाठी ज्या घरांच्या धाब्यावरून बआलमूर्तीस धूप जाळण्यात आला आणि दैवतांना पेयार्पणे वाहण्यात आली, ती सर्व घरे जाळून टाकण्यात येतील.
३०
“त्यांच्या तारुण्यापासून इस्राएलने व यहूदीयाने माझ्या नजरेत दुष्कर्म करण्याशिवाय दुसरे काहीही केले नाही; खरोखर, स्वतःच्या हस्तकृतींची उपासना करून माझा क्रोध भडकविण्याशिवाय त्यांनी दुसरे काहीही केले नाही, असे याहवेह जाहीर करतात.
३१
हे शहर बांधले त्या दिवसापासून आतापर्यंत या शहराने माझा क्रोध व संताप इतका भडकविला आहे की या शहराला मी आपल्या दृष्टीसमोरून काढून टाकणार आहे.
३२
इस्राएली व यहूदीयाच्या लोकांनी—ते, त्यांचे राजे व अधिकारी, त्यांचे याजक व संदेष्टे, यरुशलेम नगरात व यहूदीयात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या दुष्कर्माने मला अत्यंत संताप आणला आहे.
३३
त्यांनी माझ्याकडे त्यांचे मुख नव्हे तर पाठ फिरविली आहे; परत परत मी त्यांना शिक्षण दिले, पण त्यांनी माझे ऐकले नाही किंवा माझ्या शिस्तीस प्रतिसाद दिला नाही.
३४
माझे नाव धारण केलेल्या मंदिरात त्यांनी त्यांच्या अमंगळ मूर्तीची स्थापना केली व ते भ्रष्ट केले आहे.
३५
बेन हिन्नोम खोर्‍यांमध्ये त्यांनी बआल दैवतासाठी उंच उंच वेद्या बांधल्या आहेत. तिथे त्यांनी त्यांचे पुत्र व कन्या मोलख मूर्तीस अर्पण केले, हे करण्याचे मी त्यांना कधीही आज्ञापिले नव्हते—असे माझ्या मनातही कधी आले नव्हते—की ते अशी घृणास्पद कृत्ये करतील व यहूदीयास पाप करण्यास लावतील.
३६
“या नगराबद्धल तुम्ही असे म्हणता, ‘तलवार, दुष्काळ व मरी यामुळे हे शहर बाबेलच्या राजाच्या हाती पडेल, परंतु याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात:
३७
परंतु माझ्या महाक्रोधाने व उग्र कोपाने मी त्यांना ज्या देशात हाकलून दिले, त्या सर्व देशातून मी माझ्या लोकांना एकत्र करेन; मी त्यांना याच ठिकाणी परत आणेन आणि ते सुरक्षितपणे वस्ती करतील.
३८
मग ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा परमेश्वर होईन.
३९
मी त्यांना एकनिष्ठ अंतःकरण व एकमात्र कार्य देईन, जेणेकरून ते नेहमी माझे भय धरतील आणि त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलाबाळांचे सर्वदा कल्याण होईल.
४०
मी त्यांच्याबरोबर अनंतकाळचा करार करेन: मी त्यांचे कल्याण करणे कधीही थांबविणार नाही, त्यांना माझे भय धरण्यास प्रोत्साहित करेन, जेणेकरून ते माझ्यापासून कधीही विमुख होणार नाहीत.
४१
त्यांचे कल्याण करण्यात मला आनंद वाटेल व माझ्या पूर्ण मनाने व आत्म्याने मी त्यांना या देशामध्ये पुन्हा स्थापन करेन.
४२
“याहवेह म्हणतात ते असे: ही सर्व भयंकर संकटे मी या लोकांवर आणली, म्हणून आता मी त्यांना अभिवचन दिल्याप्रमाणे समृद्धी देईन.
४३
या देशाबद्दल तुम्ही म्हणत, ‘हा देश उजाड झाला आहे, इथे माणसे आणि पशू यांचा मागमूस राहिलेला नाही, कारण हा बाबिलोनचे लोकांच्या हाती देण्यात आला होता,’ तिथे शेतांची खरेदी पुन्हा सुरू होईल.
४४
बिन्यामीन प्रांतात, येथे यरुशलेममध्ये, तसेच यहूदीयाच्या शहरात, डोंगराळ प्रदेशातील नगरात, पश्चिमेच्या तळवटीच्या प्रदेशात व नेगेवमध्ये देखील चांदीची नाणी देऊन खरेदीखतांवर सह्या होतील, त्यावर शिक्का मारला जाईल, साक्षीदारांच्या सह्या होतील, कारण मी त्यांची पूर्वीची समृद्धी निश्चित परत देईन, असे याहवेह जाहीर करतात.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options