यिर्मयाह ३३:१-१३
१
यिर्मयाह अद्यापही तुरुंगात असताना याहवेहचे त्याला दुसऱ्यांदा वचन आले:
२
“याहवेह असे म्हणतात, आकाश व पृथ्वी ज्यांनी निर्माण केली व स्थापित केली—ज्यांचे नाव याहवेह आहे, ते म्हणतात:
३
‘मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन, व तुला माहीत नसलेल्या महान आणि शोधता न येणाऱ्या गोष्टी तुला सांगेन.’
४
याहवेह, इस्राएलचे परमेश्वर, या नगरातील जी घरे आणि यहूदीयातील राजवाडे वेढा देऊन व तलवारीच्या प्रहाराचा उपयोग करून पाडून टाकण्यात आले आहेत, त्याविषयी असे म्हणतात,
५
बाबेलांशी युद्ध करताना: ‘ज्या लोकांवर मी माझ्या कोपाने प्रहार करणार आहे, ते त्या लोकांच्या शवांनी भरून जातील. त्यांनी केलेल्या सर्व दुष्टतेमुळे मी या नगराला विमुख होईन.
६
“ ‘तरी देखील, मी यरुशलेमला आरोग्य व स्वास्थ्य प्रदान करेन; मी त्यांना आरोग्य देईन व विपुल शांती आणि सुरक्षितेचा आनंद उपभोगू देईन.
७
मी यहूदीया आणि इस्राएलना बंदिवासातून परत आणेन व त्यांची पुनर्बांधणी करून त्यांना पूर्ववत करेन.
८
त्यांनी माझ्याविरुद्ध केलेली सर्व पापे मी शुद्ध करेन, आणि माझ्याविरुद्ध बंडखोरी करून केलेल्या सर्व पापांची क्षमा करेन.
९
मग पृथ्वीवरील जी सर्व राष्ट्रे मी त्यांच्यासाठी केलल्या सर्व चांगल्या गोष्टी ऐकतील, त्यांच्यापुढे हे नगर मला बहुमानास्पद, आनंददायक, प्रशंसा व आदर देणारे होईल; माझ्या लोकांना मी प्रदान केलेली विपुल समृद्धी व शांती पाहून, त्या राष्ट्रांना दरारा व आदरयुक्त भीती वाटेल.’
१०
“याहवेह असे म्हणतात: ‘या नगराविषयी तुम्ही म्हणता, “हे उद्ध्वस्त झालेले ठिकाण आहे, इथे ना लोक राहतात ना पशू.” तरी देखील वैराण झालेल्या यहूदीयाच्या नगरात व यरुशलेमच्या रस्त्यांवर पुन्हा ते स्वर ऐकू येतील.
११
आनंद व हर्षाचे स्वर, वरांचे आणि वधूंचे आवाज आणि याहवेहला उपकारस्तुतीची अर्पणे आणणार्यांची हर्षगीते पुन्हा ऐकू येतील. ते म्हणतील, “याहवेहला धन्यवाद द्या, कारण ते चांगले आहेत; त्यांची प्रीती सर्वकाळ टिकते.” मी हा देश आधी होती तशी समृद्धी परत देऊन पुनर्वसित करेन,’ याहवेह असे म्हणतात.
१२
“याहवेह असे म्हणतात: ‘कोणीही मनुष्य व पशू नसलेल्या या उजाड ठिकाणी—यातील सर्व नगरात कळपांना विश्रांती मिळण्यासाठी मेंढपाळांना कुरणे मिळतील.
१३
पश्चिमेकडील डोंगरातील गावात व तळवटीत, व नेगेवच्या गावात, बिन्यामीन प्रांतात, यरुशलेमच्या सभोवतालच्या प्रदेशात आणि यहूदीयाच्या सर्व नगरात, मोजणाऱ्यांच्या हाताखालून पुन्हा त्यांचे कळप जातील,’ असे याहवेह म्हणतात.
Settings