उत्पत्ती ३५:१-८
१
मग परमेश्वराने याकोबाला म्हटले, “ऊठ आणि बेथेलला जाऊन तिथेच स्थायिक हो. तुझा भाऊ एसाव, याच्यापासून तू पळून जात असता, ज्या परमेश्वराने तुला दर्शन दिले होते, तिथे त्याच परमेश्वरासाठी एक वेदी बांध.”
२
म्हणून याकोब आपल्या सर्व कुटुंबीयांना व बरोबरच्या सर्वांना म्हणाला, “तुम्ही बरोबर आणलेल्या परक्या दैवतांचा नाश करा, शुद्ध व्हा, आपली वस्त्रे बदला.
३
चला आपण आता वर बेथेलला जाऊ या. ज्या परमेश्वराने माझ्या संकटसमयी माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले आणि मी जिथे कुठे गेलो तिथे माझ्याबरोबर राहिले, त्या परमेश्वरासाठी मी तिथे एक वेदी बांधणार आहे.”
४
तेव्हा त्या सर्वांनी आपल्याकडील इतर दैवताच्या मूर्ती व कर्णफुले याकोबाला दिली व त्याने ती शेखेमजवळ असलेल्या एका एला वृक्षाखाली पुरून टाकली.
५
मग ते पुन्हा पुढे निघाले आणि त्यांच्याभोवती असलेल्या सर्व नगरांवर परमेश्वराचे भय पडले, त्यामुळे त्यांनी याकोबाचा पाठलाग केला नाही.
६
शेवटी याकोब आणि त्याच्यासोबतचे सर्व लोक कनान देशातील लूज (याला बेथेल असेही नाव होते) येथे येऊन पोहोचले.
७
त्या ठिकाणी याकोबाने एक वेदी उभारली व त्या वेदीचे नाव त्याने एल बेथेल असे ठेवले; कारण तो एसावापासून पळून जात असता परमेश्वराने येथेच त्याला दर्शन दिले होते.
८
यानंतर लवकरच रिबेकाहची वृद्ध दाई दबोरा, ही मरण पावली आणि बेथेलच्या खोर्यात एका एला वृक्षाखाली तिला मूठमाती देण्यात आली. तेव्हापासून त्या वृक्षाला अल्लोन-बकूथ असे नाव पडले.
Settings