उत्पत्ती ३२:१५-३२
१५
तीस दुभत्या मादी उंट व त्यांची बछडी, चाळीस गाई, दहा बैल, वीस गाढवी, दहा शिंगरे, एवढी जनावरे बाजूला काढली.
१६
प्रत्येक जातीच्या जनावरांचे वेगवेगळे कळप करून त्यांना नोकरांकडे सुपूर्द करून सूचना दिली, “माझ्यापुढे चला आणि प्रत्येक कळपामध्ये काही अंतर ठेवा.”
१७
पहिला कळप नेणार्या नोकराला त्याने सांगितले: “जेव्हा माझा भाऊ एसाव तुम्हाला भेटेल आणि त्याने विचारले, ‘तुम्ही कोणाचे चाकर आहात, तुम्ही कुठे चालला आहात, ही जनावरे जी तुझ्यापुढे आहे ती कोणाची आहेत?’
१८
त्याला उत्तर द्या, ‘ही जनावरे तुमचा सेवक याकोब याची आहेत. ही त्याने आपला धनी एसावच्या भेटीदाखल पाठविली आहेत. तो स्वतः आमच्या पाठोपाठ येत आहे.’ ”
१९
याकोबाने दुसर्या, तिसर्या आणि इतर कळप हाकणार्याला सूचना दिली: “एसाव जेव्हा तुम्हाला भेटेल तेव्हा तुम्हीही हाच निरोप दिला पाहिजे.
२०
हे निश्चित बोला, ‘आपला दास याकोब आमच्या मागून येत आहे.’ ” कारण त्याने विचार केला, “मी एसावाला समोरासमोर भेटण्यापूर्वी त्याला भेटी देऊन संतुष्ट करेन; मग तो जेव्हा मला भेटेल, तेव्हा तो माझा स्वीकार करेल.”
२१
म्हणूनच आपल्यापुढे भेटी पाठवली आणि याकोबाने ती रात्र तळावरच घालविली.
२२
परंतु त्या रात्रीच याकोब उठला आणि त्याने त्याच्या दोन्ही पत्नी व उपपत्नी आणि अकरा मुले यांना जागे केले आणि यार्देन नदीच्या किनार्याने त्यांना यब्बोक नदीच्या उताराने पार नेले
२३
त्याने त्यांना नदीच्या पलीकडे पाठविल्यावर त्याची सर्व संपत्तीही त्यांच्या पाठोपाठ पलीकडे पाठविली.
२४
तिथे याकोब एकटाच होता. त्याचवेळी कोणा पुरुषाने सूर्योदय होईपर्यंत त्याच्याशी झोंबी केली.
२५
याकोबावर जय मिळणे शक्य नाही, असे पाहून त्या पुरुषाने याकोबाच्या जांघेवर प्रहार केला आणि तो सांधा त्याने उखडून टाकला.
२६
मग तो याकोबाला म्हणाला, “मला आता जाऊ दे, कारण पहाट होत आहे.” पण याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्यावाचून मी तुला जाऊ देणार नाही.”
२७
मग त्याने याकोबास विचारले, “तुझे नाव काय आहे?” तेव्हा त्याने उत्तर दिले, “याकोब.”
२८
यावर तो मनुष्य म्हणाला, “आता तुझे नाव याकोब राहणार नाही, तर ‘इस्राएल’ असे पडेल; कारण तू परमेश्वराशी व मनुष्याशीही संघर्ष करून यशस्वी झाला.”
२९
मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया आपले नाव मला सांगा.” तेव्हा तो म्हणाला, “तू मला माझे नाव का विचारतोस?” मग त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.
३०
मग याकोबाने त्या ठिकाणाचे नाव पनीएल असे ठेवले, कारण तो म्हणाला, “मी परमेश्वराचे मुख पाहिले आणि तरीही मी जिवंत राहिलो.”
३१
जेव्हा याकोब पेनुएल मधून निघाला त्यावेळी सूर्य उगवला होता आणि त्याच्या जांघेचा सांधा उखडल्यामुळे तो लंगडत होता.
३२
याच कारणास्तव इस्राएलचे लोक अजूनही जनावरांच्या जांघेतील धोंडशिरा खात नाहीत, कारण त्याने याकोबाच्या जांघेच्या स्नायुला स्पर्श केला होता.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings