उत्पत्ती ३२:१-१४
१
याकोब आपल्या वाटेने जात असता परमेश्वराचा दूत त्यास भेटले.
२
जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले, तो म्हणाला, “या ठिकाणी परमेश्वराचे सैन्यतळ आहे!” म्हणून त्याने त्या ठिकाणाचे नाव महनाईम असे ठेवले.
३
याकोबाने आता एदोम प्रांतातील सेईर प्रदेशात राहणारा आपला भाऊ एसाव, याच्याकडे आपले दूत पाठविले;
४
आणि त्याने दूतांना आज्ञा दिली की, तुम्ही माझा धनी एसाव याला जाऊन सांगा: “तुमचा सेवक याकोब म्हणतो, मी आतापर्यंत आपले मामा लाबान यांच्याकडे राहत होतो.
५
आता मी गुरे, गाढवे, मेंढरे, पुष्कळ स्त्रीपुरुष चाकर यांचा धनी झालो आहे. मी हा निरोप तुमच्याकडे पाठवित आहे कि तुमची कृपादृष्टी माझ्यावर होऊ द्यावी.”
६
निरोप्यांनी परत येऊन याकोबास सांगितले की, “आपला भाऊ एसाव चारशे लोक बरोबर घेऊन तुम्हाला भेटण्यासाठी येत आहे.”
७
हे ऐकताच याकोबाने भीतीने व व्याकूळ होऊन आपले कुटुंबीय, गुरे, शेरडेमेंढरे आणि उंट यांची दोन गटांमध्ये विभागणी केली.
८
त्याने विचार केला, “एसावाने एका गटावर हल्ला केला तर दुसर्या गटाला कदाचित निसटून जाता येईल.”
९
मग याकोबाने प्रार्थना केली, “हे याहवेह, माझे पिता अब्राहाम, आणि माझे पिता इसहाक यांच्या परमेश्वरा, तुम्ही मला माझ्या देशात आणि नातलगात परत येण्यास सांगितले व मला समृद्ध करण्याचे वचन दिले आहे.
१०
तुम्ही मला वचन दिल्याप्रमाणे जी वात्सल्य आणि विश्वसनीयता वारंवार दाखविलीस तिला वास्तविक मी पात्र नाही; मी यार्देनेच्या पलीकडे गेलो तेव्हा माझ्याजवळ एका काठीशिवाय दुसरे काहीही नव्हते आणि आता माझे दोन गट झाले आहेत.
११
तुम्ही माझी विनंती ऐकून, माझा भाऊ एसावच्या हातून मला वाचवा, मला त्याची भीती वाटते की तो येऊन मला आणि त्यांच्या आईसह मुलांनाही मारून टाकेल.
१२
परंतु तुम्ही मला समृद्ध करण्याचे आणि माझे वंशज समुद्रातील वाळूप्रमाणे अगणित करण्याचे वचन दिले आहे.”
१३
त्या रात्री याकोब तिथेच राहिला आणि आपल्याजवळ होते त्यातून त्याने आपला भाऊ एसाव याच्यासाठी एक भेट तयार केली:
१४
त्यासाठी त्याने दोनशे शेळ्या, वीस बोकड, दोनशे मेंढ्या व वीस एडके,
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings