अनुवाद ३१:११-२१
११
याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या ठिकाणी जेव्हा सर्व इस्राएली लोक उपस्थित होतील, तेव्हा हे नियमशास्त्र त्यांना ऐकू जाईल असे वाचावे.
१२
लोकांना एकत्र करा—पुरुष, स्त्रिया आणि मुले आणि तुमच्या नगरात राहत असलेले परदेशी—म्हणजे ते ऐकतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकतील व या नियमशास्त्रामधील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील.
१३
त्यांची बालके, ज्यांना हे नियमशास्त्र ठाऊक नाही, त्यांनीही यार्देन नदी ओलांडून, त्या वचनदत्त देशात, जी भूमी ताब्यात घेण्यास तुम्ही जात आहात तिथे जोपर्यंत राहाल, तोपर्यंत हे ऐकावे आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकावे.”
१४
मग याहवेह मोशेला म्हणाले, “तुझ्या मृत्यूचा दिवस जवळ आला आहे. यहोशुआला बोलव आणि तुम्ही दोघे सभामंडपात हजर व्हा म्हणजे मी तिथे त्याला नियुक्त करेन.” मग मोशे आणि यहोशुआ आले आणि सभामंडपात हजर झाले.
१५
तेव्हा याहवेह मंडपाच्या प्रवेशद्वाराशी मेघस्तंभाच्या रूपाने त्यांना प्रगट झाले आणि मेघस्तंभ द्वाराशी स्थिर राहिले.
१६
आणि याहवेह मोशेला म्हणाले: “तू आपल्या पूर्वजांसोबत विसावा घ्यावयास जाणार आहे आणि हे लोक ज्या देशात प्रवेश करणार आहेत, तिथे लवकरच परकीय दैवतांच्या समोर व्यभिचार करतील. ते माझा त्याग करतील आणि मी त्यांच्याबरोबर केलेला करार मोडतील.
१७
आणि म्हणून त्या दिवशी माझा क्रोध त्यांच्याविरुद्ध भडकेल आणि मी त्यांचा त्याग करेन; माझे मुख त्यांच्यापासून लपवेन आणि त्यांचा नाश होईल. त्यांच्यावर भयंकर संकटे व अरिष्ट येतील आणि त्या दिवशी ते म्हणतील, ‘आमचे परमेश्वर आता आम्हामध्ये नाहीत म्हणून ही संकटे आम्हावर आली आहेत का?’
१८
आणि निश्चितच इतर दैवतांची उपासना करण्याच्या त्यांच्या पातकांमुळे मी माझे मुख त्यांच्यापासून लपवेन.
१९
“म्हणून आता हे गीत तुम्ही लिहून घ्या आणि ते इस्राएलाच्या सर्व लोकांना शिकव व त्यांना गावयास सांग, म्हणजे हे गीत त्यांच्याविरुद्ध माझ्याकरिता साक्ष असेल.
२०
जो देश मी त्यांच्या पूर्वजांना शपथ वाहून देऊ केला आहे, त्या दुधामधाचा प्रवाह वाहणार्या देशात, मी त्यांना आणेन आणि ते खाऊन पिऊन तृप्त व संपन्न होतील, तेव्हा ते इतर दैवतांकडे वळतील आणि त्यांची उपासना करू लागतील, माझी उपेक्षा करतील आणि माझा करार मोडतील.
२१
आणि जेव्हा त्यांच्यावर अनेक संकटे व अरिष्टे येतील, तेव्हा हे गीत त्यांच्याविरुद्ध साक्ष असे ठरेल, कारण त्यांचे वंशज हे गीत विसरू शकणार नाही. या वचनदत्त देशात प्रवेश करण्यापूर्वीच या लोकांची प्रवृत्ती कशी आहे हे मला माहीत आहे.”
Settings