Skip to content
प्रेषित २७:१९-४३

प्रेषित २७:१९-४३

१९
तिसर्‍या दिवशी त्यांनी तारवाची अवजारे आपल्या हाताने टाकून दिली.
२०
त्या तुफानी वादळाचा भयंकर जोर होता आणि अनेक दिवस सूर्याचे व तार्‍यांचे दर्शनही आम्हास घडले नाही. शेवटी आता आमचा जीव वाचेल अशी सर्व आशा आम्ही सोडून दिली.
२१
अनेक दिवस कोणी काहीही खाल्ले नव्हते, मग शेवटी पौल उभा राहून त्यांना म्हणाला: “माणसांनो, तुम्ही माझा सल्ला ऐकून क्रेता बंदर सोडले नसते, तर हे नुकसान व हानी टळू शकली असती.
२२
तरी मी तुम्हाला विनंती करतो आता धैर्य सोडण्याची गरज नाही, आपल्यापैकी कोणाचाही नाश होणार नाही; फक्त जहाजाचेच नुकसान होईल.
२३
जो माझा परमेश्वर आहे आणि ज्याची मी सेवा करतो, त्याचा एक देवदूत काल रात्री माझ्याजवळ उभा राहिला
२४
आणि म्हणाला, ‘पौला, भिऊ नकोस, कारण तू नक्कीच कैसरापुढे चौकशीसाठी उभा राहणार आहेस; एवढेच नव्हे, तर परमेश्वराने त्यांच्या कृपेने तुझ्याबरोबर प्रवास करणार्‍या सर्वांचे जीव तुझ्या हाती दिले आहेत.’
२५
यासाठी माणसांनो, धीर धरा, कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे अगदी तसेच घडणार.
२६
परंतु आपले जहाज एका बेटावर आदळून फुटणार आहे.”
२७
चौदाव्या रात्रीस अद्रिया सागराच्या लाटांनी हैराण होऊन हेलकावे खात असताना, मध्यरात्रीच्या सुमारास खलाश्यांना वाटले की आपण एका जमिनीजवळ येत आहोत.
२८
त्यांनी तळ पाहण्यासाठी पाण्यात बुडीद टाकले, तिथे पाणी अंदाजे 37 मीटर खोल असल्याचे समजले; पुढे जाऊन पुन्हा बुडीद टाकले, तेव्हा पाण्याची खोली 27 मीटर भरली.
२९
आपले तारू खडकावर आपटेल असे भय वाटल्यामुळे, त्यांनी तारवाच्या मागच्या बाजूने चार नांगर टाकले आणि दिवस उजाडण्याची प्रार्थना करू लागले.
३०
काही खलाश्यांनी होडी सोडून पळून जाण्याचा बेत केला. नाळीवरून म्हणजे जहाजाच्या पुढच्या बाजूने नांगर टाकीत आहोत, असा बहाणा करून त्यांनी होडी खाली सोडली.
३१
परंतु पौल सैनिकांना आणि शताधिपतीला म्हणाला, “हे लोक जर तारवात राहिले नाहीत, तर तुमचे पण रक्षण होणार नाही व तुम्ही जिवंत राहणार नाही.”
३२
तेव्हा सैनिकांनी होडीचे दोर कापून ती जाईल तिकडे वाहू दिली.
३३
पहाट होण्यापूर्वी पौलाने प्रत्येकाला अन्न खाण्यासाठी विनंती केली. तो म्हणाला, “आज चौदा दिवसापासून, अनिश्चित अशा मनःस्थितीत तुम्ही उपाशी राहिला आहात, काहीही खाल्ले नाही.
३४
आता मी विनंती करतो की थोडेतरी खा म्हणजे तुमचा बचाव होईल कारण तुम्हातील कोणाच्या डोक्याच्या एकाही केसाचा नाश होणार नाही.”
३५
हे म्हटल्यानंतर, मग त्याने भाकर घेऊन सर्वांसमक्ष परमेश्वराचे आभार मानले व ती मोडून खाल्ली.
३६
ते सर्व उत्तेजित झाले व त्यांनी खाण्यास सुरुवात केली.
३७
जहाजात आम्ही सर्वजण मिळून दोनशे शहात्तर लोक होतो.
३८
त्यांनी जेवढे पाहिजे तेवढे खाल्यानंतर, खलाश्यांनी जहाजातील धान्य समुद्रात टाकले व जहाज आणखी हलके केले.
३९
दिवस उजाडला, तरी त्यांना किनारा ओळखता आला नाही, परंतु एक खाडी व तिचा सपाट किनारा, त्यांच्या दृष्टीस पडला व मचव्याने किनार्‍यावर जाण्याचा त्यांनी निश्चय केला व जलयान तिथेच ठेवले.
४०
सरतेशेवटी जेव्हा तसा प्रयत्न करण्याचे त्यांनी ठरविले, तेव्हा त्यांनी नांगर कापून टाकून, ते समुद्रात राहू दिले सुकाणूची बंधने ढिली केली आणि पुढचे शीड वार्‍यावर सोडून किनार्‍याची वाट धरली.
४१
परंतु जहाज पुढे जाऊन वाळूत रुतून बसले. नाळ घट्ट रुतली आणि वरामाचे म्हणजे जहाजाच्या मागील भागाचे आदळणार्‍या लाटांनी तुकडे तुकडे झाले.
४२
तेव्हा कैदी पोहत जाऊन पळून जाऊ नयेत म्हणून सर्व कैद्यांना ठार मारावे, अशी योजना सैनिकांनी केली.
४३
परंतु पौलाला वाचवावे अशी या शताधिपतीची इच्छा होती आणि म्हणून त्याने ती योजना मान्य केली नाही. मग त्याने हुकूम दिला की ज्यांना पोहता येत असेल, त्यांनी पहिल्याने उडी टाकून काठास जावे.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options