2 इतिहास ३०:१-९
१
हिज्कीयाहने सर्व इस्राएल आणि यहूदीया या ठिकाणी संदेश पाठविला आणि एफ्राईम व मनश्शेह यांनाही पत्र लिहून आमंत्रण दिले की, त्यांनी यरुशलेममधील याहवेहच्या मंदिरात यावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहसाठी वल्हांडण सण साजरा करावा.
२
राजा आणि त्याचे अधिकारी आणि यरुशलेममधील सर्व मंडळी यांनी असे ठरविले की, दुसऱ्या महिन्यात वल्हांडण सण साजरा करावा.
३
नेहमीच्या वेळेप्रमाणे त्यांना तो सण साजरा करता आला नव्हता, कारण स्वतःचे शुद्धीकरण केलेले असे पुरेसे याजक तिथे नव्हते आणि लोक यरुशलेममध्ये एकत्र जमले नव्हते.
४
ही योजना योग्य आहे असे राजाला आणि संपूर्ण मंडळीला वाटले.
५
त्यांनी ठरविले की, बेअर-शेबापासून दानपर्यंत संपूर्ण इस्राएलमध्ये एक घोषणापत्र पाठवावे आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेह यांचा वल्हांडण सण साजरा करण्यासाठी लोकांना यरुशलेमकडे बोलावून घ्यावे. जसे लिहिले गेले होते त्याप्रमाणे तो मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आलेला नव्हता.
६
राजाज्ञेनुसार, राजा आणि त्याच्या अधिकार्यांकडून पत्रे घेऊन संदेशवाहक संपूर्ण इस्राएल आणि यहूदीयामध्ये गेले, ज्यात लिहिले होते: “अहो, इस्राएलचे लोकहो, अब्राहाम, इसहाक आणि इस्राएलचे परमेश्वर याहवेहकडे परत या, म्हणजे, अश्शूरी राजांच्या हातातून जे निसटले आहेत त्यांच्याकडे ते परत येतील.
७
तुमच्या पालकांसारखे होऊ नका आणि तुमच्याबरोबर असलेल्या इस्राएली लोकांसारखे होऊ नका, जे त्यांच्या पूर्वजांचे परमेश्वर याहवेहबरोबर अविश्वासू राहिले, त्यामुळे त्यांनी त्यांना उपहासाचे पात्र केले, जसे ते तुम्हाला दिसतात.
८
तुम्ही तुमच्या पूर्वजांसारखे ताठ मानेचे होऊ नका. याहवेहना शरण जा. त्यांनी सनातनकाळासाठी पवित्र केलेल्या त्यांच्या पवित्रस्थानात या. तुमचे परमेश्वर याहवेहची सेवा करा, म्हणजे त्यांचा भयंकर क्रोध तुमच्यापासून दूर होईल.
९
जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत.”
Settings