Skip to content
1 राजे ११:२६-४०

1 राजे ११:२६-४०

२६
जेरेदाह येथील एक एफ्राईमकर, नेबाटाचा पुत्र यरोबोअमने सुद्धा शलोमोन राजाविरुद्ध बंड केले. त्याची आई विधवा होती, तिचे नाव जेरुआह होते.
२७
त्याने राजाविरुद्ध बंड कसे केले त्याचा वृत्तांत असा: शलोमोनने स्तरीय बांधकाम व त्याचा पिता दावीदाच्या शहराच्या भिंतीची खिंडारे दुरुस्त केली.
२८
यरोबोअम एक शूरवीर होता. या तरुणाने आपले काम किती उत्तम प्रकारे केले आहे, हे शलोमोनने पाहिले, तेव्हा त्याने त्याला योसेफाच्या गोत्रातील सर्व मजूर कामगारांवर मुख्य असे नेमले.
२९
त्याच दरम्यान यरोबोअम यरुशलेमातून बाहेर जात असताना, शिलोनी अहीयाह नावाचा संदेष्टा, नवीन झगा घातलेला असा त्याला वाटेत भेटला. ते त्या मैदानात दोघेच होते,
३०
अहीयाहने घातलेला आपला नवीन झगा घेऊन तो फाडून त्याचे बारा तुकडे केले.
३१
आणि तो यरोबोअमास म्हणाला, “तुझ्यासाठी दहा तुकडे उचलून घे, कारण याहवेह इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: ‘पाहा, मी शलोमोनच्या हातून राज्य हिसकावून घेईन व दहा गोत्र मी तुझ्या हाती देईन.
३२
पण माझा सेवक दावीद आणि यरुशलेम शहर ज्याची मी इस्राएलच्या सर्व गोत्रांतून निवड केली त्याच्याप्रित्यर्थ, शलोमोनच्या हातात एक गोत्र राहील.
३३
मी असे केले आहे कारण त्यांनी माझा त्याग केला आहे आणि सीदोन्यांची देवी अष्टारोथ, मोआबाचे दैवत कमोश आणि अम्मोन्यांचे दैवत मिलकाम यांची उपासना केली आणि ते माझ्या आज्ञेनुसार चालले नाहीत किंवा माझ्या दृष्टीने जे बरे ते केले नाही किंवा शलोमोनचा पिता दावीदाने केले तसे माझे विधी व नियम त्यांनी पाळले नाहीत.
३४
“ ‘परंतु मी शलोमोनच्या हातून आताच संपूर्ण राज्य हिसकावून घेणार नाही; माझा सेवक दावीदाप्रीत्यर्थ मी त्याला त्याच्या जीवनभर अधिकारी असे नेमले आहे, कारण मी दावीदाला निवडले व त्याने माझ्या आज्ञा व विधींचे पालन केले.
३५
परंतु मी शलोमोनच्या पुत्राच्या हातून राज्य काढून दहा गोत्र तुला देईन.
३६
मी शलोमोनच्या पुत्राला एक गोत्र देईन, यासाठी की ज्या यरुशलेम नगरास मी माझ्या नावासाठी निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद याचा दीप सदा माझ्यासमोर पेटलेला असेल.
३७
आणि तुझ्याविषयी म्हटले तर, तुला मनास वाटेल त्यावर तू राज्य करशील; इस्राएलवर तू राज्य करशील.
३८
मी तुला दिलेल्या आज्ञांनुसार जर तू करशील, माझा सेवक दावीदाने केले त्याप्रमाणे माझ्या आज्ञेत चालशील व माझे विधी व आज्ञा पाळून माझ्या दृष्टीत जे योग्य ते करशील, तर मी तुझ्याबरोबर राहीन. दावीदाचे जसे मी कायमचे राज्य स्थापले आहे, तसेच तुझी व तुझ्या राज्याची स्थापना मी करेन व इस्राएल तुझ्या हाती देईन.
३९
असे करून मी दावीदाच्या वंशजांना नम्र बनवीन, पण सर्वकाळासाठी नव्हे.’ ”
४०
शलोमोनने यरोबोअमला ठार मारण्याचा प्रयत्न केला, पण यरोबोअम इजिप्त देशाचा राजा शिशाककडे पळून गेला आणि शलोमोनचा मृत्यू होईपर्यंत तिथेच राहिला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options