Skip to content
गणना ११:१-१५

गणना ११:१-१५

१
मग असे झाले की लोक याहवेहसमोर असताना त्यांच्या कष्टांबद्दल तक्रार करू लागले. जेव्हा याहवेहने ते ऐकले तेव्हा त्यांचा राग भडकला आणि त्यांच्यामध्ये याहवेहचा अग्नी पेटला आणि छावणीच्या बाहेरील काही भाग भस्म झाला.
२
जेव्हा लोकांनी मोशेकडे धावा केला व त्याने याहवेहकडे विनंती केली आणि अग्नी विझला.
३
म्हणून त्या जागेचे नाव तबेरा असे पडले, कारण याहवेहचा अग्नी त्यांच्यामध्ये पेटला होता.
४
नंतर त्यांच्याबरोबर असलेले निम्नस्तरातील मिश्र लोक अन्य भोजनाची लालसा धरू लागले आणि इस्राएली लोकही पुन्हा रडत म्हणू लागले, “आम्हाला खायला मांस असते तर किती बरे!
५
इजिप्त देशात आम्ही फुकट मासे खाल्ले; आणि काकड्या, खरबुजे, कंदभाजी, कांदे आणि लसूण यांची सुद्धा आम्हाला आठवण येते.
६
परंतु आता आमची भूक नाहीशी झाली आहे; कारण या मान्न्याशिवाय आम्हाला दुसरे काहीच दिसत नाही!”
७
मान्ना आकाराने धण्यासारखा असून रंगाने मोत्यासारखा होता.
८
लोक चोहीकडे जाऊन तो गोळा करीत असत आणि मग जात्यात दळीत किंवा उखळात कुटत असत. मग ते भांड्यात शिजवित किंवा त्याच्या भाकरी बनवित असत. त्याची चव जैतुनाच्या तेलात बनलेल्या भाकरीप्रमाणे असे.
९
रात्री जेव्हा छावणीवर दहिवर जमा होत असे तेव्हा मान्ना सुद्धा पडत असे.
१०
प्रत्येक घराण्यातील लोक आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून रडत होते आणि याहवेहचा त्यांच्यावर अतिशय क्रोध आला होता त्यामुळे मोशे अस्वस्थ झाला.
११
मोशेने याहवेहला विचारले, “तुमच्या सेवकावर हे कष्ट तुम्ही का आणले? तुम्ही असंतुष्ट व्हावे असे मी काय केले की तुम्ही या सर्व लोकांचे ओझे माझ्यावर लादावे?
१२
मी या सर्व लोकांचे गर्भधारण केले काय? त्यांना मी जन्म दिला काय? आई आपल्या तान्ह्या बाळाला घेते तसे मी यांना माझ्या उराशी घेऊन तुम्ही त्यांच्या पूर्वजांना शपथ घेऊन वचन दिलेल्या देशात मी घेऊन जावे असे तुम्ही मला का सांगता?
१३
या सर्व लोकांसाठी मी मांस कुठून आणावे? ते रडत माझ्याजवळ मागतात ‘आम्हाला खायला मांस दे!’
१४
मला एकट्याला या राष्ट्राला घेऊन जाता येत नाही! हे ओझे मला खूप जड आहे.
१५
तुम्ही मला असेच वागविणार असाल आणि तुमच्या दृष्टीत मी जर कृपा पावलो असलो तर मला मारून टाका. मी माझाच नाश पाहावा असे होऊ देऊ नये.”

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options