Skip to content
लूक ५:१-१२

लूक ५:१-१२

१
एके दिवशी येशू गनेसरेत सरोवराच्या किनार्‍यावर उभे होते, परमेश्वराचे वचन ऐकण्यासाठी लोकांनी त्यांच्याभोवती गर्दी केली.
२
त्यांनी पाण्याच्या कडेला कोळ्यांनी ठेवलेल्या दोन होड्या पाहिल्या, कारण कोळी आपली जाळी धूत होते.
३
त्यापैकी एका होडीत ते बसले जी शिमोनाची होती आणि ती काठापासून थोडीशी बाजूला करावी असे त्यांनी शिमोनाला सांगितले. मग त्या होडीत बसून त्यांनी लोकांना शिक्षण दिले.
४
येशूंनी आपले बोलणे संपविल्यानंतर, ते शिमोनास म्हणाले, “होडी खोल पाण्यात ने आणि मासे पकडण्यासाठी जाळी टाक.”
५
शिमोनाने उत्तर दिले, “गुरुजी, आम्ही रात्रभर परिश्रम केले, पण काहीच हाती लागले नाही. पण तुम्ही सांगता, म्हणून जाळे टाकतो.”
६
तसे केल्यानंतर त्यांनी इतक्या मोठ्या संख्येने मासे पकडले की त्यांच्या जाळ्या फाटू लागल्या.
७
जे सहकारी दुसर्‍या होडीत होते, त्यांनी येऊन आपल्याला मदत करावी म्हणून त्यांनी त्यांना इशारा केला आणि लवकरच त्या दोन होड्या माशांनी इतक्या गच्च भरल्या की बुडू लागल्या.
८
शिमोन पेत्राने हे पाहिले, तेव्हा त्याने येशूंच्या पुढे गुडघे टेकले आणि म्हणाला, “प्रभू कृपा करून, माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे!”
९
कारण त्यांनी धरलेले पुष्कळ मासे पाहून, तो आणि त्याच्या बरोबरचे इतर जोडीदार आश्चर्यचकित झाले होते;
१०
आणि त्याचबरोबर शिमोनाचे भागीदार जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान यांनाही आश्चर्य वाटले होते. येशू शिमोनाला म्हणाले, “भिऊ नको, येथून पुढे मी तुला माणसे धरणारा करेन.”
११
त्यांनी होडी काठाला लावल्यावर सर्वकाही तिथेच सोडले आणि ते त्यांच्यामागे गेले.
१२
येशू एका गावात असता एक कुष्ठरोगाने भरलेला मनुष्य तिथे आला. त्याने येशूंना पाहिले, तेव्हा त्यांच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभू, जर तुमची इच्छा असेल, तर मला शुद्ध करण्यास तुम्ही समर्थ आहात.”
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options