लेवीय ७:११-३८
११
“याहवेहसाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:
१२
“उपकारस्तुती म्हणून केलेल्या शांत्यर्पणात तेल लावलेल्या बेखमीर जाड भाकरी, बेखमीर व वरून तेल लावलेल्या पातळ पापड्या, नीट मळलेल्या व तेल मिसळलेल्या उत्तम पिठाच्या जाड भाकरी असाव्यात.
१३
उपकारस्तुतीच्या या शांत्यर्पणासह खमीर घालून केलेल्या जाड भाकरींचेही अर्पण करावे.
१४
या अर्पणातील काही भाग संपूर्ण अर्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून प्रत्येक प्रकारची भाकर वेदीपुढे याहवेहला अर्पण करावी, म्हणजे याजक जो वेदीवर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडतो त्या याजकाचाच त्यावर हक्क असेल.
१५
उपकारस्तुती करिता अर्पिलेल्या शांत्यर्पणातील यज्ञबलीचे मांस अर्पण केल्या दिवशीच खावे; सकाळपर्यंत त्यातील काही शिल्लक ठेऊ नये.
१६
“परंतु यज्ञबलीचे अर्पण नवसाचे अथवा स्वैच्छिक असेल, तर अर्पणातील भाग त्या दिवशीच खावे, पण उरलेले भाग दुसर्या दिवशी खाण्यास हरकत नाही.
१७
अर्पणातील काही मांस तिसर्या दिवसापर्यंत शिल्लक राहिले असेल तर ते अग्नीत जाळून टाकावे.
१८
शांत्यर्पणाच्या मांसापैकी काही मांस तिसर्या दिवशी खाल्ले, तर ज्याने ते अर्पण केले असेल त्याला स्वीकारले जाणार नाही. त्याचे त्यांना काहीच श्रेय मिळणार नाही, कारण ते अशुद्ध झाले आहे; त्यापैकी काहीही खाणारा व्यक्ती जबाबदार धरला जाईल.
१९
“ ‘ज्या मांसाचा स्पर्श एखाद्या विधिनियमानुसार अपवित्र वस्तूला झाल्यास ते खाऊ नये; ते जाळून टाकावे. दुसरे मांस जो कोणी विधिपूर्वक शुद्ध आहे, तो ते खाऊ शकतो.
२०
परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे.
२१
जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ”
२२
याहवेह मोशेला म्हणाले,
२३
“इस्राएली लोकांस सांग: तुम्ही बैलांची, मेंढरांची किंवा शेळ्यांची चरबी खाऊ नये.
२४
मेलेल्या प्राण्याची चरबी किंवा हिंस्त्र श्वापदाने फाडलेल्या प्राण्याची चरबी सापडली तर ती इतर कामासाठी वापरता येईल, परंतु तुम्ही ती खाऊ नये.
२५
याहवेहला केलेल्या होमार्पणातील चरबी जो कोणी खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा.
२६
जिथे कुठे तुम्ही राहाल, पशूचे किंवा पक्ष्याच्या रक्ताचे केव्हाही सेवन करू नये.
२७
जो कोणी ते खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा.”
२८
याहवेह मोशेला म्हणाले,
२९
इस्राएली लोकांस सांग: जो कोणी याहवेहसाठी शांत्यर्पण आणेल, त्याने त्याचा काही भाग याहवेहला अर्पणासाठी वेगळा आणावा.
३०
त्याने तो स्वहस्ते याहवेहस अर्पण करावा. चरबी व ऊर यांचे अर्पण आणून वेदीसमोर ओवाळले जाऊन ते याहवेहला ओवाळणीचे अर्पण करावे.
३१
मग याजक चरबीचे वेदीवर हवन करेल, पण ऊर अहरोन व त्याच्या पुत्रांचे होईल.
३२
तू त्याची उजवी मांडी शांत्यर्पणाचा भाग म्हणून याजकास द्यावी.
३३
अहरोनाच्या पुत्रांपैकी जो शांत्यर्पणातील रक्त व चरबी अर्पण करेल, त्याला त्याचा वाटा म्हणून उजवी मांडी देण्यात यावी.
३४
कारण ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही इस्राएली लोकांतर्फे याजक अहरोन आणि त्याच्या पुत्रांना दिली आहेत. शांत्यर्पणाचा हा भाग त्यांचा सर्वकाळचा वाटा म्हणून देण्यात यावा.
३५
होमार्पणातील हा भाग याहवेहची सेवा करण्यासाठी नेमलेल्या सर्व याजकांना, म्हणजेच अहरोन व त्याच्या पुत्रांना दिला पाहिजे.
३६
कारण याहवेहनी त्यांचा अभिषेक केला, त्याच दिवशी त्यांनी इस्राएली लोकांना आज्ञा दिली की, त्यांनी हा सर्वकाळचा वाटा त्या वंशाला पिढ्यान् पिढ्या द्यावा.
३७
होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण, याजकांच्या अभिषेकाचे अर्पण व शांत्यर्पण यांच्या विधीसंबंधीचे हे नियम आहेत.
३८
याहवेहनी हे नियम सीनाय पर्वतावर मोशेला दिले. सीनायच्या रानात इस्राएली लोकांना याहवेहप्रीत्यर्थ कोणती अर्पणे आणावी म्हणून मोशेला हे नियम देण्यात आले.
Settings