Skip to content
शास्ते १:८-२०

शास्ते १:८-२०

यहूदाह गोत्राच्या लोकांनी यरुशलेमवर हल्ला केला आणि ते देखील जिंकून घेतले. तेथील लोकांची तलवारीने कत्तल केली आणि त्या शहराला आग लावून दिली.
त्यानंतर यहूदाह डोंगराळ प्रदेशात, नेगेव आणि पश्चिमेकडील पायथ्याशी राहणाऱ्या कनानी लोकांशी युद्ध करण्यास उतरले.
१०
मग त्या हेब्रोनात (ज्याला पूर्वी किर्याथ-अर्बा म्हणत) राहणार्‍या कनान्यांवर यहूदाहने हल्ला केला आणि त्यांनी शेशय, अहीमान, व तलमय यांचा पराभव केला.
११
तिथून त्यांनी दबीरमध्ये (पूर्वी दबीरचे नाव किर्याथ-सेफर होते) राहणार्‍या लोकांवर हल्ला केला.
१२
कालेब म्हणाला, “जो पुरुष किर्याथ-सेफरवर स्वारी करून ते हस्तगत करेल, त्याला मी आपली कन्या अक्साह ही पत्नी म्हणून देईन.”
१३
कालेबाचा लहान भाऊ केनाजचा पुत्र ओथनिएलाने ते जिंकून घेतले; म्हणून कालेबाने आपली कन्या अक्साह पत्नी म्हणून त्याला दिली.
१४
एक दिवस जेव्हा ती ओथनिएलकडे आली, तेव्हा तिने तिच्या वडिलांना शेत देण्याची त्याला विनंती केली. जेव्हा ती गाढवावरून उतरली, तेव्हा कालेबाने तिला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे?”
१५
तिने उत्तर दिले, “माझ्यावर विशेष कृपा करा. तुम्ही मला नेगेव प्रांतात जमीन दिलेली आहेच, मला पाण्याचे झरेही द्या.” म्हणून कालेबाने तिला वरचे आणि खालचे झरे दिले.
१६
मोशेच्या सासर्‍याचे वंशज, केनी वंशातले लोक यहूदाहच्या वंशाबरोबर खजुरीच्या शहरातून अरादजवळील नेगेव येथे यहूदीयाच्या रानातील लोकांमध्ये जाऊन राहिले.
१७
नंतर यहूदाहचे लोक शिमओनी लोकांबरोबर त्यांच्या सोबतच्या इस्राएली लोकांबरोबर गेले आणि त्यांनी जेफथ येथे राहणार्‍या कनानी लोकांवर आक्रमण केले आणि त्या शहराचा संपूर्ण नाश केला. म्हणून त्याला होरमाह असे म्हणतात.
१८
यहूदाहने गाझा, अष्कलोन आणि एक्रोन ही—शहरे व त्यांच्या सभोवतालचा प्रदेशही जिंकून घेतला.
१९
याहवेह यहूदाहच्या लोकांसह होते. त्यांनी डोंगराळ प्रदेशातील देशांचा पूर्णपणे ताबा घेतला, परंतु खोर्‍यात राहणार्‍या लोकांजवळ लोखंडी रथ असल्याने त्यांना ते हाकलू शकले नाहीत.
२०
मोशेने अभिवचन दिल्याप्रमाणे कालेबला हेब्रोन देण्यात आले, ज्याने अनाकाच्या तीन पुत्रांना हाकलून लावले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options