यिर्मयाह ४४:२०-३०
२०
तेव्हा हे उत्तर देणार्या सर्व स्त्रीपुरुषांना यिर्मयाह म्हणाला,
२१
“तुम्ही, तुमचे पूर्वज, तुमचे राजे व अधिपती, आणि सर्व लोक यहूदीयाच्या नगरामध्ये, आणि यरुशलेमच्या रस्त्यांवर मूर्तींपुढे धूप जाळीत होता, हे याहवेहच्या स्मरणात नाही का व ते त्यांनी दर्शवून दिले नाही का?
२२
तुम्ही जी सर्व दुष्कृत्ये करीत होता, ती सहन करणे याहवेहला अशक्य झाले; म्हणून तुमची भूमी शापित झाली व ओसाड होऊन निर्मनुष्य झाली, जशी ती आजही आहे.
२३
जी तुम्ही बघता ती भयानक संकटे तुमच्यावर कोसळली याचे खरे कारण एकच आहे, ते म्हणजे तुम्ही मूर्तींपुढे धूप जाळला, याहवेहविरुद्ध पाप केले आणि त्यांच्या आज्ञा, नियम व करार पाळण्याचे नाकारले.”
२४
मग यिर्मयाह पुन्हा त्या सर्वांना व त्यांच्याबरोबर असलेल्या स्त्रियांना म्हणाला, “इजिप्तमध्ये असलेल्या यहूदीयाच्या सर्व नागरिकांनो, याहवेहचा संदेश ऐका!
२५
सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: तुम्ही आणि तुमच्या स्त्रियांनी म्हटले, ‘आम्ही निश्चितच आकाशराणीस धूप जाळू व तिला पेयार्पणे करू.’ “तर मग करा, तिला दिलेली वचने पूर्ण करा! तुमचे संकल्पही पूर्ण करा!
२६
तरीपण इजिप्त देशात राहणार्या सर्व यहूद्यांनो, याहवेहचे वचन ऐका: ‘मी आपल्या थोर नामाची शपथ घेत आहे, याहवेह म्हणतात, इजिप्त देशात राहणारे कोणीही यहूदीयाचे नागरिक “सार्वभौम याहवेहच्या नावाची शपथ.” असे कधीही म्हणणार नाही.
२७
इजिप्तमधील सर्व यहूदी लोक तलवारीने व दुष्काळाने नाश पावतील; तोपर्यंत त्यांच्या भल्यासाठी नव्हे तर अनिष्टासाठी माझी त्यांच्यावर नजर आहे.
२८
तलवारीपासून वाचलेले जे इजिप्त देशातून यहूदीयाला परत जातील, ते अगदी थोडके असतील. मग इजिप्त देशात येऊन राहणाऱ्या यहूदीयाच्या सर्व अवशेष नागरिकांना कळेल की कोणाचा शब्द खरा ठरतो—माझा की त्यांचा.
२९
“ ‘याहवेह जाहीर करतात, या ठिकाणी मी तुम्हाला शिक्षा करण्याचे हे चिन्ह मी तुम्हाला देईन, म्हणजे तुमच्यावर संकटे कोसळणार या मी दिलेल्या धमक्या खऱ्या आहेत हे तुम्हाला कळेल.’
३०
याहवेह असे म्हणतात: ‘जसे मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याला त्याचा जीव घेऊ पाहणार्या बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरच्या हवाली केले होते, तसेच मी इजिप्तचा राजा, फारोह होफ्रा, याला त्याचा जीव घेऊ पाहणार्यांच्या हातात देईन.’ ”
Settings