यिर्मयाह २५:३०-३८
३०
“म्हणून आता त्यांच्याविरुद्ध हा सर्व संदेश दे व त्यांना सांग: “ ‘याहवेह त्यांच्या उच्च स्थानातून गर्जना करतील; त्यांच्या पवित्रस्थानातून ते मेघनाद करतील आणि स्वतःच्या भूमीविरुद्ध गर्जना करतील पृथ्वीवरील सर्व रहिवाशांविरुद्ध. द्राक्षे तुडविणाऱ्यासारखे ते आरोळी मारतील,
३१
हा क्षोभ पृथ्वीच्या दिगंतापर्यंत दुमदुमेल, कारण सर्व राष्ट्रांविरुद्ध याहवेह आरोप करतील; ते संपूर्ण मानवजातीचा न्याय करतील सर्व दुष्ट लोकांना तलवारीच्या स्वाधीन करतील.’ ” याहवेहची ही घोषणा आहे.
३२
सर्वसमर्थ याहवेह जाहीर करतात, “पाहा! विपत्ती पसरत आहे एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात; पृथ्वीच्या टोकापासून एक भयंकर वादळ उठत आहे.”
३३
त्या दिवशी याहवेहने वधलेल्या लोकांनी पृथ्वी व्यापून जाईल—त्यांच्यासाठी कोणीही विलाप करणार नाही, अथवा मूठमाती देण्यासाठी त्यांची प्रेते कोणी गोळा करणार नाही. ते भूमीवर शेणाप्रमाणे पडून राहतील.
३४
अहो मेंढपाळांनो, दुःखाने रडा आणि विलाप करा; मानवजातीच्या कळपांच्या पुढार्यांनो, धुळीत लोळा. कारण तुमचा वध होण्याची वेळ आता आली आहे; मातीच्या उत्तम भांड्यासारखे तुम्ही सर्व कोसळून पडाल.
३५
मेंढपाळांना पळून जाण्यास कुठेही जागा मिळणार नाही, पुढाऱ्यांना सुटकेसाठी मार्ग आढळणार नाही.
३६
मेंढपाळ मारीत असलेल्या आरोळ्या ऐका, कळपांच्या पुढाऱ्यांचा विलाप ऐका! याहवेह त्यांची कुरणे उद्ध्वस्त करीत आहेत.
३७
आता शांत कुरणे उजाड होतील याहवेहच्या भयानक क्रोधाला बळी पडतील.
३८
सिंह आपली गुहा सोडतो तसे ते आपले विश्रांतिस्थान सोडतील, आणि जुलूम करणाऱ्यांच्या तलवारीमुळे आणि परमेश्वराच्या तीव्र क्रोधामुळे त्यांची भूमी उद्ध्वस्त होईल.
Settings