यशायाह ५:१६-३०
१६
परंतु सर्वसमर्थ याहवेह त्यांच्या न्यायाद्वारे उच्च केले जातील, आणि पवित्र परमेश्वर त्यांच्या नीतिमान कृत्यांद्वारे पवित्र ठरतील.
१७
तेव्हा मेंढरे स्वतःच्या कुरणात चरत असल्यासारखी चरतील; श्रीमंतांच्या अवशेषांमध्ये कोकरे चरतील.
१८
धिक्कार असो, जे कपटाच्या दोरीने पाप ओढवून घेतात, आणि दोरीने गाडी ओढल्यागत जे दुष्टता ओढवून घेतात.
१९
धिक्कार असो, जे असे म्हणतात, “परमेश्वराला घाई करू द्या; त्यांना त्यांचे काम लवकर करू द्या म्हणजे आपल्याला ते पाहता येईल. इस्राएलच्या पवित्र परमेश्वराची योजना— ती जवळ येऊ द्या, ती दृष्टीस पडू द्या, म्हणजे आम्हाला ती कळेल.”
२०
धिक्कार असो, जे वाईटाला चांगले म्हणतात आणि चांगल्याला वाईट म्हणतात, जे अंधाराला प्रकाश आणि प्रकाशाला अंधार, जे गोड त्याला कडू आणि कडू त्याला गोड असे म्हणतात.
२१
धिक्कार असो, जे स्वतःच्या दृष्टीत शहाणे आहेत आणि स्वतःच्या नजरेत हुशार आहेत.
२२
धिक्कार असो, जे मद्य पिण्यामध्ये वीर आहेत आणि पेय मिसळण्यात जे विजयीवीर आहेत,
२३
लाच घेऊन दुष्टाला जे सोडून देतात, परंतु निर्दोषांना योग्य न्यायापासून वंचित करतात.
२४
म्हणून, जसे अग्नीच्या ज्वाला पेंढी जाळून भस्म करतात आणि जसे कोरडे गवत ज्वालेमध्ये राख होते, तशीच त्यांची मुळे कुजून जातील, आणि त्यांची फुले वाऱ्याने धुळीसारखी उडून जातील; कारण त्यांनी सर्वसमर्थ याहवेहचे नियम नाकारले आहे आणि इस्राएलच्या पवित्र परमेश्वराचे वचन झिडकारले आहे.
२५
म्हणूनच याहवेहचा क्रोध त्यांच्या लोकांविरुद्ध भडकला आहे; त्यांनी हात उगारला आहे आणि ते त्यांना मारून टाकतात. पर्वत डगमगतात, आणि मृतदेह रस्त्यांवर कचऱ्यासारखे पडलेले आहेत. हे सर्व करूनही, त्यांचा क्रोधाग्नी अजून शमला नाही, त्यांचा हात अजूनही उगारलेलाच आहे.
२६
दूरवरच्या राष्ट्रांसाठी ते एक ध्वज उंचावतात, पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जे आहेत, त्यांना ते शिट्ट्या वाजवून बोलवितात. हे बघा ते आले, तत्काळ आणि वेगाने!
२७
त्यांच्यापैकी एकजणसुद्धा थकत नाही किंवा अडखळत नाही, एकजणसुद्धा डुलकी घेत नाही किंवा झोपत नाही; एकाही कमरेचा पट्टा सैल केलेला नाही, एकाही चप्पलेचा पट्टा तुटलेला नाही.
२८
त्यांचे बाण तीक्ष्ण आहेत, त्यांच्या सर्व धनुष्यांच्या तारा ताणून तयार आहेत; त्यांच्या घोड्यांचे खूर गारगोटी सारखे वाटतात, त्यांच्या रथाची चाके वावटळीसारखी दिसतात.
२९
त्यांची गर्जना एखाद्या सिंहासारखी आहे, तरुण सिंहाप्रमाणे ते गर्जना करतात; ते गुरगुरतात व त्यांचे सावज पकडतात, आणि ते घेऊन जातात तेव्हा कोणीही सोडविण्यास येत नाही.
३०
त्या दिवशी ते त्याच्यावर समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गर्जना करतील. आणि जर कोणी भूमीकडे पाहिले तर, तिथे फक्त अंधार आणि संकट आहे; ढगांमुळे सूर्यदेखील काळवंडेल.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings