Skip to content
उत्पत्ती ४:१-१६

उत्पत्ती ४:१-१६

मग आदामाने आपली पत्नी हव्वा हिच्याशी प्रीती संबंध केला, तेव्हा ती गर्भवती झाली आणि तिने काईन नावाच्या मुलाला जन्म दिला. ती म्हणाली, “याहवेहच्या साहाय्याने मी एका पुरुषाला प्राप्त केले आहे.”
नंतर तिने त्याचा भाऊ हाबेलास जन्म दिला. हाबेल मेंढपाळ होता आणि काईन शेतीकाम करीत होता.
हंगामाचे वेळी काईनाने याहवेहला दान देण्यासाठी आपल्या जमिनीतील काही उत्पन्न आणले.
हाबेलानेही आपल्या मेंढरातील प्रथम जन्मलेली धष्टपुष्ट मेंढरे आणून परमेश्वराला अर्पण केली. याहवेहने हाबेलाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले,
पण काईनाच्या अर्पणास प्रीतीने ग्रहण केले नाही, म्हणून त्याला खूप राग आला आणि त्याचा चेहरा उतरला.
याहवेहने काईनला विचारले, “तू का संतापलास? तुझ्या चेहर्‍यावर निराशा का दिसते?
तू योग्य ते केलेस तर तुझाही स्वीकार केला जाणार नाही काय? पण तू योग्य ते करण्याचे नाकारशील तर सावध राहा, तुझा सर्वनाश करावा म्हणून पाप तुझ्या दारावर हल्ला करण्यास टपून बसले आहे; पण त्यावर तू विजय मिळव.”
एके दिवशी काईन आपला भाऊ हाबेलास म्हणाला, “चल, आपण शेतात जाऊ.” त्याप्रमाणे शेतात गेल्यावर काईनाने आपल्या भावावर हल्ला करून त्याचा वध केला.
मग याहवेहने काईनाला विचारले, “तुझा भाऊ हाबेल कुठे आहे?” “मला माहीत नाही.” त्याने प्रत्युत्तर दिले. “मी काय माझ्या भावाचा राखणदार आहे?”
१०
याहवेह त्याला म्हणाले, “तू हे काय केलेस? आता ऐक, तुझ्या भावाचे रक्त मला जमिनीतून हाक मारीत आहे.
११
ज्या भूमीने तुझ्या भावाचे रक्त स्वीकारण्यास आपले मुख उघडले आहे, त्या भूमीतून तुला हद्दपार करण्यात आले आहे आणि तू शापित आहेस.
१२
त्या भूमीवर तू कष्ट केलेस तरी ती तुला उपज देणार नाही. तू बेचैन असा पृथ्वीवर भटकशील.”
१३
काईन याहवेहला म्हणाला, “मला मिळालेली शिक्षा माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे.
१४
कारण तुम्ही मला माझ्या शेतातून हद्दपार केले आहे आणि तुमच्या सानिध्यापासून दूर केले आहे; मी पृथ्वीवर बेचैन असा भटकणारा होईन, जो कोणी मला पाहील, तो मला ठार करेल.”
१५
यावर याहवेहने त्याला उत्तर दिले, “असे होणार नाही, जर कोणी काईनाचा जीव घेईल, तर त्याला मी तुला दिलेल्या शिक्षेपेक्षा सातपट शिक्षा देईन” आणि मग त्याचा वध कोणीही करू नये, असा इशारा देणारी एक खूण याहवेहने काईनावर केली.
१६
मग काईन याहवेहच्या समक्षतेतून निघून गेला आणि एदेन बागेच्या पूर्वेस असलेल्या नोद नावाच्या देशात वस्ती करून राहिला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options