Skip to content
एस्तेर ९:१-१२

एस्तेर ९:१-१२

बाराव्या म्हणजे अदार महिन्याच्या तेराव्या दिवशी, राजाची दोन्हीही फर्माने अंमलात यावयाची होती. त्या दिवशी यहूद्यांचे शत्रू यहूद्यांना धुळीस मिळविण्याची आशा बाळगून होते. परंतु प्रत्यक्षात अगदी उलटेच घडले. सर्व प्रांतांतील यहूदी लोक, त्यांना उपद्रव देणाऱ्यांना वरचढ झाले.
त्या शत्रूपासून संरक्षण व्हावे म्हणून अहश्वेरोश राजाच्या सर्व प्रांतांतील यहूदी लोक आपआपल्या शहरांमध्ये एकत्र आले. परंतु त्यांना कोणीही उपद्रव दिला नाही, कारण सर्व जातीच्या लोकांना यहूद्यांची धास्ती वाटू लागली होती.
सर्व प्रांतांच्या अधिपतींनी म्हणजे राज्यपाल, प्रांतप्रमुख, प्रतिष्ठित व सरकारी कर्मचाऱ्यांनी यहूद्यांनाच मदत केली, कारण ते मर्दखयाच्या भीतीने ग्रासून गेले होते.
मर्दखया राजवाड्यात एक महत्त्वाचा व्यक्ती होता; त्याची किर्ती सर्व प्रांतात पसरली होती व तो आता अत्यंत प्रबळ झालेला होता.
त्या नेमलेल्या दिवशी यहूदी लोकांनी आपल्या शत्रूंची कत्तल करून संहार केला व त्यांचा नाश केला आणि जे त्यांचा तिरस्कार करीत असत, त्यांना आवडेल तसे वागविले.
यहूद्यांनी शूशन राजधानीत पाचशे पुरुष ठार करून नष्ट केले.
त्यांनी यहूद्यांचा शत्रू म्हणजे हम्मदाथाचा पुत्र हामानच्या पर्शन्दाथा, दलफोन, अस्पाथा, पोराथा, आदल्या, अरीदाथा, पर्माश्ता, अरीसई, अरीदय व वैजाथा या दहा पुत्रांनाही ठार केले. परंतु त्यांनी त्यांच्या मालमत्तेवर हात टाकला नाही.
११
शूशन राजधानीत ठार झालेल्यांची संख्या राजाला त्याच दिवशी कळविण्यात आली,
१२
तेव्हा त्याने एस्तेर राणीला बोलाविले व तो म्हणाला, “शूशन राजधानीतच यहूद्यांनी पाचशे लोक ठार केले आहेत आणि हामानाच्या दहा पुत्रांचाही संहार केला आहे. तर राज्याच्या इतर प्रांतात त्यांनी काय केले असेल? आता तुझी काय मागणी आहे? ते तुला दिले जाईल. तुझी काय विनंती आहे? ते देखील करण्यात येईल.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options