Skip to content
अनुवाद ३२:१-१४

अनुवाद ३२:१-१४

अहो आकाशमंडळांनो, ऐका आणि मी बोलेन; हे पृथ्वी, माझ्या मुखातील शब्दांकडे लक्ष दे.
माझे शिक्षण तुमच्या कानावर पावसाच्या सरीप्रमाणे पडो, माझ्या शब्दांची दवाप्रमाणे पखरण होवो, नव्या गवतावर पडणार्‍या पावसाप्रमाणे, कोवळ्या रोपांवर पावसाच्या सरींप्रमाणे वृष्टी करोत.
मी याहवेहचे नाव जाहीर करेन. आपल्या परमेश्वराच्या महानतेची स्तुती गा!
तेच आमचे खडक आहेत, त्यांचे कार्य परिपूर्ण आहे. आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य असतात. विश्वासयोग्य परमेश्वर, जे कधीच चूक करीत नाही, ते न्यायी आणि सत्यनिष्ठ आहेत.
ती आता त्यांची लेकरे राहिली नाहीत, कारण ती भ्रष्ट झाली आहेत; त्यांना लाज वाटेल की ते एक विकृत आणि कुटिल पिढी आहेत.
अहो मूर्ख आणि मतिमंद लोकांनो, याहवेहची परतफेड करण्याची ही रीत आहे काय? ते तुमचे जनक, तुमचे पिता नाहीत काय? त्यांनीच तुम्हाला बनविले व घडविले नाही काय?
पूर्वीच्या काळातील दिवस आठवा; तुमच्या गत पिढ्यांची वर्षे स्मरणात आणा. तुमच्या वडिलांना विचारा व ते तुम्हाला सांगतील. तुमच्या वडीलजनांकडे विचारणा करा, ते याचा खुलासा करतील.
जेव्हा सर्वोच्चांनी पृथ्वीवरील राष्ट्रांना त्यांचे वतन दिले, तेव्हा त्यांनी सर्व मानवजातीची विभागणी केली, इस्राएलाच्या पुत्रांच्या संख्येनुसार त्यांच्या सीमारेषा आखून दिल्या.
कारण याहवेहची प्रजाच त्यांची संपत्ती होती, याकोब हे त्यांचे वैयक्तिक वतन आहे.
१०
एका मरुभूमीत त्यांना ते भेटले ते घोर व भयाण अरण्य होते. त्यांनी त्याचे जतन व संरक्षण केले; त्यांच्या डोळ्यातील बाहुलीसारखे त्याचे रक्षण केले,
११
गरुडपक्षीण आपले घरटे हालविते आणि पिलांवर घिरट्या घालते, आपले पंख पसरून, आपल्या पिलांना आपल्या पंखावर सुरक्षित वाहून नेते.
१२
तसे फक्त याहवेहच याकोबाला चालवित होते; इतर कोणतेही परदेशी दैवत त्याच्यासोबत नव्हते.
१३
याहवेहने त्याला देशातील उंचीवर स्वार केले, आणि शेतातील फळे खायला दिली. खडकातून पाझरणारा मध, आणि डोंगर कपारीतून तेलाचा पौष्टिक आहार पुरविला,
१४
त्यांनी त्याला कळपातील गाईंचे दही-दूध, पुष्ट शेळ्या आणि मेंढरे, आणि बाशानाचे अस्सल मेंढे, आणि सर्वोत्तम गहू पुरविला, तुम्ही गडद लाल फेसाळणारा द्राक्षारसही प्यालात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options