दानीएल ११:२-९
२
“आता मी तुला सत्य सांगतो: आता पुढे घडणार्या गोष्टींचा दृष्टान्त मी तुला दाखवितो. पर्शियात आणखी तीन राजे उदयास येतील आणि मग चौथा राजा जो सर्वांहून अतिशय धनवान असेल. तो धनसंपत्तीने प्रबळ झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल.
३
तेव्हा आणखी एक पराक्रमी राजा उदयास येईल, जो महान पराक्रमाने राज्य करेल आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे तो करेल.
४
त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्यांना दिले जाईल.
५
“दक्षिणेचा राजा सामर्थ्यशाली होईल, परंतु त्याच्या सेनापतींपैकी एक त्याच्यापेक्षाही बलाढ्य होईल आणि तो स्वतःच्या राज्यावर बलशाली होऊन राज्य करेल.
६
काही वर्षानंतर ते एकमेकांशी सलोखा करतील. दक्षिणेच्या राजाची कन्या उत्तरेच्या राजाकडे तह करण्यासाठी जाईल, परंतु तिच्याकडे सामर्थ्य राहणार नाही आणि तो व त्याची शक्ती टिकणार नाही. त्या दिवसांत, शाही रक्षकांसह आणि तिचे वडील आणि मदतनीस तिच्यासोबत विश्वासघात करतील.
७
“तिच्या कुळातील एकाचा उदय होईल जो तिची जागा घेईल. तो उत्तरेच्या राजाच्या सैन्यावर हल्ला करेल आणि त्याच्या किल्ल्यात प्रवेश करेल; तो त्यांच्याशी युद्ध करेल आणि विजयी होईल.
८
तो त्यांचे दैवत, त्यांच्या धातूच्या मूर्ती आणि सोन्या-चांदीच्या मौल्यवान पात्रांना ताब्यात घेऊन इजिप्तला नेईल. काही वर्षे तो उत्तरेकडील राजाला एकटा सोडेल.
९
मग उत्तरेकडील राजा दक्षिणेकडील राजाच्या राज्यावर कूच करेल, परंतु तो आपल्या देशात परत जाईल.
Settings