2 शमुवेल ५:१-१५
१
इस्राएलच्या सर्व गोत्रांचे लोक हेब्रोन येथे दावीदाकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तर तुमचेच मांस आणि रक्त आहोत.
२
मागील काळात, जेव्हा शौल आमचा राजा होता, तेव्हा इस्राएलला त्यांच्या युद्धात चालविणारे तुम्हीच तर होता. आणि याहवेहने तुम्हाला म्हटले, ‘माझ्या इस्राएल लोकांचा मेंढपाळ व त्यांचा अधिकारी तू होशील.’ ”
३
जेव्हा इस्राएलचे सर्व वडील लोक हेब्रोनात दावीद राजाकडे आले, तेव्हा राजाने त्यांच्याशी याहवेहसमोर हेब्रोन येथे एक करार केला आणि त्यांनी दावीदाला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
४
दावीद तीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने चाळीस वर्षे राज्य केले.
५
त्याने हेब्रोन येथून यहूदीयावर सात वर्षे आणि सहा महिने राज्य केले आणि सर्व इस्राएल व यहूदाह यांच्यावर यरुशलेमात तेहतीस वर्षे राज्य केले.
६
राजा आणि त्यांची माणसे यरुशलेममध्ये राहत असलेल्या यबूसी लोकांवर हल्ला करण्यासाठी निघाले. यबूसी लोक दावीदाला म्हणाले, “तू या शहरात प्रवेश करू शकणार नाही; येथील आंधळे आणि लंगडेही तुम्हाला बाहेर हाकलून लावतील.” त्यांना वाटले, “दावीद येथे आत येऊ शकणार नाही.”
७
तरीही, दावीदाने सीयोन गड हस्तगत केला; हेच दावीदाचे शहर आहे.
८
त्या दिवशी दावीदाने म्हटले होते, “जो कोणी यबूसी लोकांवर विजय मिळवील त्याने पाण्याच्या झोताकडून जाऊन ‘आंधळे व लंगडे’ अशा दावीदाच्या शत्रूंवर हल्ला करावा म्हणूनच असे म्हटले जाते, ‘आंधळे आणि लंगडे’ राजवाड्यात प्रवेश करणार नाहीत.”
९
दावीदाने त्या गडामध्ये आपला निवास केला आणि त्याला दावीदाचे शहर असे म्हटले. त्याने बुरुजापासून आतील भागापर्यंत तट बांधले.
१०
आणि दावीद अधिकाधिक शक्तिशाली बनत गेला, कारण याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर त्याच्याबरोबर होते.
११
आता सोरचा राजा हीरामाने दावीदाकडे दूत पाठविले, त्यांच्याबरोबर देवदारू लाकडे व सुतार आणि गवंडी पाठवले आणि त्यांनी दावीदासाठी एक राजवाडा बांधला.
१२
तेव्हा दावीदाने जाणले की, याहवेहने आपल्याला इस्राएलवर राजा म्हणून स्थापित केले आहे आणि आपल्या इस्राएली लोकांसाठी त्याचे राज्य उंच केले आहे.
१३
दावीदाने हेब्रोन सोडल्यानंतर यरुशलेमात आणखी उपपत्नी आणि पत्नी केल्या आणि त्याला आणखी पुत्र आणि कन्या झाल्या.
१४
यरुशलेममध्ये जन्मलेल्या त्याच्या मुलांची नावे ही: शम्मुआ, शोबाब, नाथान, शलोमोन,
१५
इभार, एलीशुआ, नेफेग, याफीय,
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings