2 इतिहास १८:१८-२७
१८
मिखायाह पुढे म्हणाला, “तर आता याहवेहचे वचन ऐका: याहवेह आपल्या सिंहासनावर बसलेले आणि स्वर्गातील सर्व समुदाय त्यांच्या डावीकडे व उजवीकडे उभा असलेला मला दिसला.
१९
आणि याहवेहने म्हटले, ‘इस्राएलचा राजा अहाब याने जाऊन रामोथ-गिलआदावर हल्ला करून तिथे मरून पडावे म्हणून त्याला कोण मोह घालेल?’ “तेव्हा एकाने एक तर दुसर्याने दुसरी मसलत दिली.
२०
तेव्हा एक आत्मा पुढे आला, आणि याहवेहपुढे उभा राहिला आणि म्हणाला, ‘मी त्याला मोह घालेन.’ “याहवेहने विचारले, ‘तू हे कसे करशील?’
२१
“तो म्हणाला, ‘मी जाऊन त्याच्या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा होईन.’ “याहवेहने म्हटले, ‘तू त्याला मोहात पाडण्यास यशस्वी होशील, जा आणि तसे कर.’
२२
“तर आता पाहा, याहवेहने तुझ्या या सर्व संदेष्ट्यांच्या मुखात फसविणारा आत्मा घातला आहे. आणि तुझ्यावर अरिष्ट यावे असे याहवेह बोलले आहेत.”
२३
तेव्हा केनानाहचा पुत्र सिद्कीयाह उठला व मिखायाहच्या गालावर चापट मारत विचारले, “याहवेहचा आत्मा माझ्यामधून निघून तुझ्याशी बोलायला कोणत्या मार्गाने गेला?”
२४
मिखायाहने उत्तर दिले, “ज्या दिवशी तू घराच्या आतील खोलीत जाऊन लपशील तेव्हा तुला ते समजेल.”
२५
तेव्हा इस्राएलच्या राजाने आज्ञा दिली, “मिखायाहला घ्या आणि शहराचा अधिकारी आमोन व राजपुत्र योआश यांच्याकडे त्याला परत पाठवा,
२६
आणि त्यांना सांगा, ‘राजा असे म्हणतात: या मनुष्याला तुरुंगात टाका आणि मी सुखरुप परत येईपर्यंत त्याला केवळ भाकर आणि पाणी द्या.’ ”
२७
तेव्हा मिखायाह म्हणाला, “तू जर सुखरुप परत आलास तर याहवेह माझ्याद्वारे बोललेच नाही असे समजावे.” तो पुढे म्हणाला, “लोकांनो, तुम्ही सर्वजण हे लक्षात ठेवा!”
Settings