Pleasure बद्दल बायबलमधील वचने: Worldly
Worldly बद्दल वचने
“जरी दुष्टपणा त्याच्या जिभेला गोडवा देते आणि तो आपल्या जिभेखाली ते दाबून ठेवतो,
ती चव नाहीशी होऊ नये असे त्याला वाटते म्हणून हळूहळू चघळत राहतो,
तरीही त्याने खाल्लेले अन्न त्याच्या पोटात आंबट होऊन त्याला पचत नाही; त्याच्या पोटात ते सापाच्या विषासारखे होईल.
गिळून घेतलेली सर्व संपत्ती त्याला थुंकावी लागणार; परमेश्वरच त्याच्या पोटातून त्याला ते ओकायला लावेल.
तो सापाचे विष चोखून घेईल; विषारी सापाचा दंश त्याला जिवे मारेल.
डफ आणि वीणा यांच्या तालावर ते गीते गातात; आणि बासरीच्या स्वरावर हर्षनाद करतात.
ते आपला जीवनक्रम समृद्धीत घालवितात आणि शांतीने खाली कबरेत जातात.
“चोरलेले पाणी गोड लागते; गुप्तपणे खाल्लेले अन्न चविष्ट लागते!”
मूर्खपणा विवेकहीन मनुष्यास आनंदित करतो, पण विवेकशील मनुष्य सरळ मार्ग धरून राहतो.
भोग विलासाची आवड असणारा गरीब होतो; मद्यपान व सुगंधी तेलाची आवड धरणारा कधीही श्रीमंत होत नाही.
मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्याचा पाठलाग केल्यासारखे आहे.
मी स्वतःशी म्हटले, “आता ये, चांगले काय आहे, ते शोधण्यासाठी आनंदाने मी तुझी पारख करतो.” पण ते देखील व्यर्थच असे सिद्ध झाले.
मी म्हणालो, “हास्य तर वेडेपणा आहे आणि सुखात काय लाभ आहे?”
मी स्वतःला द्राक्षारसाने हर्षित करण्याचा प्रयत्न केला व मूर्खता जवळ करून—तरीही माझे मन मला ज्ञानाने चालवित होते. मनुष्य या पृथ्वीवरील थोडक्या दिवसांमध्ये काय चांगले करू शकतो हे मला हे बघायचे होते.
मी मोठे प्रकल्प हाती घेतले: स्वतःसाठी घरे बांधली आणि द्राक्षमळे लावले.
मी बागा आणि उद्याने बनवून त्यामध्ये प्रत्येक प्रकारची फळझाडे लावली.
त्या बहरलेल्या झाडाना पाणी मिळावे म्हणून मी जलाशय बनविले.
मी दास व दासी खरेदी केले आणि माझ्या घरात जन्मलेले इतर दास देखील होते. माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये कोणाही कडे नव्हते इतके जास्त कळप आणि गुरे माझ्या मालकीचे होते.
मी स्वतःसाठी चांदी आणि सोन्याचा व राजांच्या व प्रांताच्या मौल्यवान वस्तूंचा मोठा संग्रह केला. मी गायक आणि गायिका ठेवल्या, तसेच उपपत्न्यांसाठी जनानखानाही तयार केला—जे मनुष्याचे हृदय हर्षित करते.
माझ्यापूर्वी यरुशलेममध्ये असलेल्यांपेक्षा मी फार थोर झालो. या सर्वांमध्ये माझे ज्ञान माझ्यासोबत राहिले.
माझ्या नेत्रांनी जे इच्छिले असे काहीही मी नाकारले नाही; माझ्या हृदयाला कोणत्याही सुखासाठी नकार दिला नाही. माझ्या सर्व कष्टसाध्य कार्याने माझे अंतःकरण हर्षित होत असे, हाच माझ्या सर्व परिश्रमांचा मोबदला होता.
तरी जेव्हा माझ्या सर्व हस्तकृतीचे, आणि माझ्या कष्टसाध्य कार्याने मी काय मिळविले याचा मी आढावा घेतला, तर सर्वकाही व्यर्थ, वार्याचा पाठलाग करण्यासारखे होते; सूर्याखाली काहीच लाभले नाही.
मग मी सुज्ञान समजून घ्यावे, आणि वेडेपणा व मूर्खता हे सुद्धा कळावे म्हणून मी माझे विचार त्याकडे वळविले. जे गतकाळात केलेले आहे त्यापेक्षा अधिक एखाद्या राजाच्या नंतर येणारा पुरुष काय करू शकतो?
मी पाहिले की सुज्ञान मूर्खतेपेक्षा अधिक चांगले आहे, जसा प्रकाश अंधारापेक्षा चांगला आहे.
जे सकाळी लवकर उठतात व मद्यप्राशनाकडे धाव घेतात, रात्री उशीरा द्राक्षमद्याच्या नशेमध्ये धुंद होईपर्यंत जागे राहतात त्यांचा धिक्कार असो!