Skip to content

Blood बद्दल बायबलमधील वचने

48 वचने · 36 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह असे म्हणतात: यावरून मी याहवेह आहे हे तुला कळेल: माझ्या हातात जी काठी आहे, ती मी नाईल नदीच्या पाण्यावर मारीन, आणि तिचे रक्त होईल.

  2. मग नाईल नदीतील मासे मरतील आणि नदीला दुर्गंध सुटेल; इजिप्तचे लोक ते पाणी पिऊ शकणार नाहीत.’ ”

  3. मग याहवेह मोशेला म्हणाले, “अहरोनाला सांग, ‘आपली काठी घेऊन, इजिप्तचे पाणी म्हणजेच नद्या, नाले, तलाव व सर्व तळे यावर आपला हात लांब कर; आणि त्याचे रक्त होईल’ इजिप्तमध्ये सर्वत्र, लाकडी भांड्यात व दगडी पात्रात सुद्धा रक्त असेल.”

  4. मोशे व अहरोन यांनी याहवेहच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपल्या हातातील काठी, फारोहच्या व त्याच्या सेवकांच्या समक्ष उंच केली आणि नाईल नदीच्या पाण्यावर मारली आणि नदीतील सर्व पाण्याचे रक्तात रूपांतर झाले.

  5. नाईल नदीतील सर्व मासे मेले, व त्यामुळे पाण्याला इतकी दुर्गंधी सुटली की इजिप्तच्या लोकांना ते पाणी पीता येईना, इजिप्त देशात सर्वत्र रक्त झाले होते.

  6. पण इजिप्तच्या जादूगारांनीही आपल्या गुप्तज्ञानाने पाण्याचे रक्त केले. फारोहचे मन पुन्हा कठीण झाले व याहवेहने सांगितल्याप्रमाणे त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही.

  7. आणि फारोहने हे मनावर न घेता, तो आपल्या राजवाड्यात परतला.

  8. आणि इजिप्तच्या लोकांनी नाईल नदीच्या किनार्‍यावर खणले, कारण नदीचे पाणी ते पिऊ शकत नव्हते.

  9. याहवेहने नाईलवर प्रहार करून सात दिवस लोटले.

  10. जिथे कुठे तुम्ही राहाल, पशूचे किंवा पक्ष्याच्या रक्ताचे केव्हाही सेवन करू नये.

  11. जो कोणी ते खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा.”

  12. इस्राएलांच्या घराण्यातील कोणीही किंवा त्यांच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी, जो रक्त खातो त्या माणसाविरुद्ध मी माझे मुख फिरवेन आणि मी त्यांना लोकांमधून बहिष्कृत करेन.

  13. कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर शिंपडण्यासाठी ते दिले आहे; रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते.

  14. म्हणून मी इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुमच्यामधील कोणीही किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी यापैकी कोणीही रक्ताचे सेवन करू नये.”

  15. “ ‘इस्राएली किंवा तुमच्यामध्ये असलेला कोणीही विदेशी शिकारीला गेला असता, त्याने खाण्यास योग्य असलेला पशू किंवा पक्षी यांची शिकार केली, तर त्याचे रक्त जमिनीवरच ओतून मातीने झाकून टाकावे,

  16. कारण रक्त हे प्रत्येक प्राण्याचे जीवन आहे. म्हणून इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुम्ही कोणत्याही प्राण्याचे रक्त खाऊ नका, कारण प्रत्येक प्राण्याचे जीवन हे त्याचे रक्त आहे; जो कोणी रक्ताचे सेवन करेल त्याला बहिष्कृत केलेच पाहिजे.”

  17. याहवेह तुमच्या परमेश्वराने वतन म्हणून दिलेल्या देशात तुम्ही आल्यावर एखाद्या शेतामध्ये वध झालेला मनुष्यदेह तुम्हाला आढळला व त्याला कोणी मारले हे समजले नाही,

  18. तर वडीलजनांनी आणि न्यायाधीशांनी तिथे जाऊन त्या मृतदेहापासून आजूबाजूच्या प्रत्येक नगरापर्यंत अंतर मोजावे.

  19. नंतर मृतदेहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील वडीलजनांनी, कधीही कामास न लावलेली आणि पूर्वी कधीही जू न ठेवलेली अशी एक कालवड घ्यावी

  20. आणि तिला वडिलांनी ज्या भूमीची कधी नांगरणी अथवा पेरणी केलेली नाही, अशा सतत पाणी वाहत असलेल्या खोर्‍यात नेऊन तिथे कालवडीची मान मोडावी.

  21. यानंतर लेवी वंशातील याजक जवळ येतील, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यांना आपल्यासमोर सेवा करण्यासाठी याहवेहच्या नावाने आशीर्वाद देण्यासाठी व वाद आणि हल्ला यांचे निर्णय घेण्यासाठी निवडलेले आहे.

  22. मग मृत माणसाच्या देहाच्या सर्वात जवळ असलेल्या नगरातील सगळे वडीलजन आपले हात खोर्‍यात मान मोडून टाकलेल्या त्या कालवडीवर धुतील,

  23. आणि त्यांनी हे घोषित करावे, “आमच्या हातांनी हा रक्तपात केलेला नाही किंवा आमच्या डोळ्यांनी तो पाहिलेला नाही.

  24. हे याहवेह, ज्या तुमच्या इस्राएली लोकांना तुम्ही सोडविले आहे, त्या लोकांना तुम्ही क्षमा करा व निरपराधी माणसाच्या हत्येचा आरोप त्यांच्यावर ठेवू नका.” मग या रक्तपाताचे प्रायश्चित्त होईल,

  25. आणि तुम्ही तुमच्यावरील निरपराधी माणसाच्या रक्तपाताचा दोष घालवून टाकाल, कारण याहवेहच्या दृष्टीने योग्य ते केले आहे.