Skip to content
स्तोत्रसंहिता ८९:३८-५१

स्तोत्रसंहिता ८९:३८-५१

३८
मग माझा अव्हेर करून तुम्ही मला का दूर लोटले? तुम्ही तुमच्या अभिषिक्तावर एवढे संतप्त झाला आहात.
३९
तुमच्या सेवकाशी केलेला करार तुम्ही झुगारून दिला आहे; आणि त्याचा राजमुकुट धुळीत फेकून तो भ्रष्ट केला आहे.
४०
त्याचे रक्षण करणारे तट तुम्ही मोडून टाकले आहेत; त्याचा प्रत्येक किल्ला तुम्ही जमीनदोस्त केला आहे.
४१
येणारा जाणारा प्रत्येकजण त्याला लुबाडतो; आणि तो त्याच्या शेजार्‍यांकरिता घृणापात्र झाला आहे.
४२
तुम्ही त्याच्या शत्रूचा उजवा हात उच्च केला आहे; आणि त्यांना हर्षित केले आहे.
४३
तुम्ही त्याच्या तलवारीची धार बोथट केली आहे आणि लढाईत त्याला मदत करण्याचे नाकारले आहे.
४४
तुम्ही त्याचे वैभव नष्ट केले आहे आणि त्याचे सिंहासन धुळीत टाकले आहे.
४५
त्याच्या तारुण्याचे दिवस खुंटविले आहेत; आणि त्याला लज्जेच्या वस्त्राने पांघरले आहे. सेला
४६
हे याहवेह, असे कुठवर चालणार? तुम्ही स्वतःला सर्वकाळ लपवून ठेवणार काय? कुठवर तुमचा क्रोधाग्नी भडकत राहणार?
४७
माझ्या आयुष्याच्या क्षणभंगुरतेचे स्मरण करा. तुम्ही मानवाला किती व्यर्थ जीवन जगण्यासाठी निर्माण केले!
४८
कोण सर्वकाळ जगेल व ज्याला मरणाचा अनुभव येणार नाही, कोण स्वतःला अधोलोकाच्या सत्तेपासून सोडवू शकेल? सेला
४९
हे परमेश्वरा, तुमच्या पूर्वीच्या महान प्रीतीची शपथ, जी तुम्ही दावीदाशी विश्वासूपणे केली होती, ती आता कुठे गेली?
५०
हे परमेश्वरा, तुमच्या सेवकाची कशी थट्टा झाली याची आठवण करा, माझ्या ह्रदयात सर्व देशांचा तिरस्कार मी कसा सहन करू!
५१
याहवेह, हे सर्व अपमान जे तुमच्या शत्रूंनी केले, त्या उपहासाचे प्रहार पावलोपावली तुमच्या अभिषिक्ताला मिळाले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options