स्तोत्रसंहिता ११९:९३-११७
९३
मी तुमचे नियम कधीही विसरणार नाही, कारण त्यांच्याद्वारे तुम्ही माझ्या जीवनाचे जतन केले आहे.
९४
मी तुमचा आहे, माझे तारण करा; कारण मी तुमच्या विधीचा शोधक आहे.
९५
दुष्ट लोक माझा नाश करण्याची वाट पाहत आहेत, तरी मी माझे चित्त तुमच्या अधिनियमाकडे लावेन.
९६
प्रत्येक परिपूर्णतेला सीमा असते, परंतु तुमच्या आज्ञा निस्सीम आहेत.
९७
अहाहा, मी तुमच्या विधिनियमांवर कितीतरी प्रीती करतो! मी दिवसभर त्यांचे चिंतन करतो.
९८
तुमची वचने सतत माझ्यासह असतात, आणि ती माझ्या शत्रूंपेक्षा मला अधिक ज्ञानी करतात.
९९
मला माझ्या सर्व शिक्षकांहून अधिक शहाणपण आहे, कारण तुमच्या नियमांचे मी सतत मनन करतो.
१००
मी माझ्या वडीलजनांपेक्षाही अधिक सुज्ञ आहे, कारण मी तुमच्या आज्ञा पाळतो.
१०१
दुष्टाईच्या मार्गावर मी माझी पावले टाकीत नाही, जेणेकरून मी तुमच्या आज्ञांचे पालन करू शकेन.
१०२
मी तुमच्या वचनाकडे पाठ फिरवीत नाही; कारण तुम्ही स्वतः मला शिक्षण दिले आहे.
१०३
किती मधुर आहेत तुमची वचने, माझ्या मुखात ती मला मधापेक्षाही गोड लागतात!
१०४
तुमच्या नियमांद्वारेच मला सुज्ञता प्राप्त होते; म्हणून मी प्रत्येक खोट्या मार्गाचा तिरस्कार करतो.
१०५
तुमचे वचन माझ्या पावलांकरिता दिवा व माझ्या मार्गावरील प्रकाश आहे.
१०६
मी शपथ घेतली आहे व सुनिश्चित केले आहे, की मी तुमच्या नीतियुक्त नियमांचे पालन करेन.
१०७
याहवेह, माझी पीडा असह्य झाली आहे; आपल्या अभिवचनाप्रमाणे माझे जतन करा.
१०८
याहवेह, माझ्या मुखातून निघालेल्या स्वैच्छिक स्तवनाचा स्वीकार करा, आणि तुमचे नियम मला शिकवा.
१०९
जरी मी माझे जीवन सतत स्वतःच्या हातात घेतो, तरी मी तुमचे नियम विसरणार नाही.
११०
दुष्ट लोकांनी माझ्यासाठी सापळे लावलेले आहेत, तरीपण मी तुमच्या मार्गावरून ढळणार नाही.
१११
तुमचे नियम माझा सर्वकाळचा वारसा आहेत, माझ्या अंतःकरणाचा उल्हास आहेत.
११२
शेवटपर्यंत पूर्ण हृदयाने तुमचे आज्ञापालन करण्याचे मी निश्चित केले आहे.
११३
दुटप्पी लोकांचा मला तिरस्कार वाटतो, पण मला तुमचे नियम प्रिय आहेत.
११४
तुम्ही माझा आश्रय व माझी ढाल आहात; तुमच्या अभिवचनांवर मी आशा ठेवली आहे.
११५
अहो कुकर्मी लोकांनो, माझ्यापासून दूर व्हा, जेणेकरून माझ्या परमेश्वराच्या आज्ञांचे मी पालन करेन.
११६
हे परमेश्वरा, तुमच्या अभिवचनानुसार माझे जतन करा, म्हणजे मी जिवंत राहीन; माझी आशाभंग होऊ देऊ नका.
११७
मला उचलून धरा म्हणजे माझी सुटका होईल; मी तुमच्या नियमांचा नेहमी आदर करतो.
Settings