Skip to content
गणना ३५:९-२८

गणना ३५:९-२८

नंतर याहवेह मोशेला म्हणाले:
१०
“इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: जेव्हा तुम्ही यार्देन पार करून कनानमध्ये जाल,
११
तुमच्यासाठी आश्रयनगरे व्हावी म्हणून तुम्ही काही शहरे निवडून ठेवा, म्हणजे कोणी एखाद्याला चुकून जिवे मारले तर त्याने तिथे पळून जावे.
१२
सूड घेणार्‍यापासून आश्रय म्हणून ही नगरे तुमच्यासाठी असावीत, अशासाठी की खुनी असल्याचा दोष असणारा, मंडळीसमोर खटला होण्यापूर्वीच मारला जाऊ नये.
१३
ही जी सहा नगरे तुम्ही द्याल ती तुमच्यासाठी आश्रयाची नगरे म्हणून असतील.
१४
या आश्रयाच्या नगरांपैकी तीन नगरे यार्देनेच्या अलीकडे व तीन कनानमध्ये असावीत.
१५
ही सहा नगरे इस्राएली लोकांसाठी व त्यांच्यामध्ये रहिवासी असलेल्या परदेशीयांसाठी सुद्धा आश्रयाचे ठिकाण असे असावे, अशासाठी की कोणी एखाद्याला चुकीने जिवे मारले असता त्याने त्या ठिकाणी पळून जावे.
१६
“ ‘जर कोणा व्यक्तीने लोखंडी वस्तूने एखाद्यावर घातक हल्ला केला, तर तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
१७
किंवा कोणी दगड घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
१८
किंवा कोणी लाकडी वस्तू घेऊन एखाद्यावर घातक हल्ला करतो, तो व्यक्ती खुनी आहे; त्या खुनी मनुष्याला अवश्य जिवे मारावे.
१९
रक्ताचा सूड घेणार्‍याने त्या खुनी मनुष्याला जिवे मारावे; जेव्हा सूड घेणार्‍याला खुनी मनुष्य सापडेल; सूड घेणार्‍याने खुनी मनुष्याला जिवे मारावे.
२०
जर कोणी एखाद्याला द्वेषभावनेने लोटून दिले किंवा त्याने मरावे अशा हेतूने काही फेकून मारले
२१
किंवा जर वैरभावाने एखाद्याला बुक्की मारली व तो मेला, तर त्या व्यक्तीला मारून टाकले जावे; कारण तो खुनी आहे. रक्ताचा सूड घेणारा जेव्हा त्या खुनी व्यक्तीला भेटेल तेव्हा त्याने त्याला अवश्य जिवे मारावे.
२२
“ ‘पण काही शत्रुत्व नसताना अचानक कोणी एखाद्याला ढकलतो किंवा चुकीने त्यांच्यावर एखादी वस्तू फेकतो
२३
किंवा न पाहताच त्यांना मारून टाकू शकेल असा जड दगड त्यांच्यावर टाकेल, व तो व्यक्ती जर मेला, परंतु ज्याने मारले तो त्याचा शत्रू नव्हता व त्याने ती हानी मुद्दाम केली नाही,
२४
म्हणून मंडळीने या नियमानुसार आरोपी आणि रक्ताचा सूड घेणारा यांच्यात न्याय करावा.
२५
खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीला मंडळीने रक्ताचा सूड घेणार्‍यापासून वाचवावे व तो ज्या आश्रयाच्या नगराकडे पळून गेला होता त्याकडे त्याला पाठवावे. पवित्र तेलाने अभिषेक झालेल्या मुख्य याजकाचा मृत्यू होईपर्यंत आरोपी मनुष्याने तिथेच राहावे.
२६
“ ‘परंतु आरोपी ज्या आश्रय नगरात पळून गेला आहे त्याच्या सीमेबाहेर गेला
२७
आणि रक्ताचा सूड घेणार्‍याला तो शहराच्या बाहेर सापडला आणि रक्ताचा सूड घेणार्‍याने त्याला जिवे मारले तर त्या खुनासाठी तो दोषी ठरणार नाही.
२८
कारण आरोपीने त्या आश्रयाच्या नगरात महायाजकाचा मृत्यू होईपर्यंत राहिले पाहिजे; महायाजकाच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या स्वतःच्या घरी जावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options