Skip to content
गणना ३५:१-८

लेव्यांची नगरे आणि कुरणे

गणना ३५:१-८
यरीहो समोर मोआबाच्या मैदानात यार्देनजवळ याहवेह मोशेला म्हणाले,
“इस्राएली लोकांना आज्ञा दे की त्यांना मिळालेल्या वतनातून लेवी लोकांना राहण्यासाठी त्यांनी नगरे आणि नगराभोवतालची कुरणेही द्यावीत.
म्हणजे त्यांना राहण्यासाठी नगरे व त्यांच्या मालकीची असणारी त्यांची गुरे मेंढरे व सर्व इतर जनावरांसाठी कुरणे असावीत.
“नगराभोवतालची जी कुरणे तुम्ही लेवी लोकांना देणार ती नगराच्या कुसापासून एक हजार हात असावी.
नगराबाहेर पूर्वेच्या दिशेने दोन हजार हात, दक्षिणेच्या दिशेने दोन हजार हात, पश्चिमेकडे दोन हजार हात व दोन हजार हात उत्तरेकडे मोजावे आणि नगर मध्यभागी असावे. हाच भाग त्यांच्या नगरांसाठी कुरण म्हणून असावा.”
“लेवी लोकांना जी शहरे तुम्ही द्याल, त्यापैकी सहा शहरे आश्रयाची शहरे म्हणून असावीत, जर एखाद्या व्यक्तीने कोणाला जिवे मारले तर त्याने त्यात पळून जावे. त्याचबरोबर इतर बेचाळीस नगरे लेवी लोकांना द्यावीत.
अशी लेवी लोकांना त्यांच्या कुरणांसह एकंदर अठ्ठेचाळीस नगरे द्यावीत.
लेवी लोकांना जी नगरे तुम्ही द्याल ती इस्राएली लोकांच्या प्रत्येक गोत्राला मिळालेल्या वतनाच्या प्रमाणात: म्हणजे ज्यांना पुष्कळ नगरे मिळाली त्यांच्याकडून पुष्कळ, परंतु ज्यांना थोडी नगरे मिळाली त्यांच्याकडून थोडी नगरे घेऊन द्यावीत.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options