नहेम्याह ३:१५-२७
१५
कोल-होजेचा पुत्र शल्लूम मिस्पाह जिल्ह्याचा अधिकारी होता. त्याने झरा वेशीची दुरुस्ती करून ती परत बांधली, तिच्यावर छत टाकले व दरवाजे उभे करून त्यांना अडसर व गज लावले. नंतर शेलाह तळ्यापासून राजाच्या बागेपर्यंतच्या, यरुशलेमच्या दावीदाच्या नगराच्या उतारावरील पायर्यापर्यंतच्या कोटाची त्याने दुरुस्ती केली.
१६
त्याच्या पलीकडे अजबुकाचा पुत्र नहेम्याह होता. तो बेथ-सूर जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता. त्याने दावीद राजाच्या कबरस्तानापर्यंत, कृत्रिम तळ्यापर्यंत आणि वीरांचे गृह या ठिकाणापर्यंत दुरुस्ती केली.
१७
त्याच्या शेजारी लेवी बानीचा पुत्र रहूमच्या देखरेखीखाली डागडुजी करीत होता. त्याच्या शेजारी कईलाह जिल्ह्याच्या अर्ध्या भागाचा अधिकारी हशब्याह होता. त्याने आपल्या जिल्ह्यांच्या वतीने डागडुजी केली.
१८
त्याच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिनुई च्या देखरेखीखाली लेव्याच्या वंशजांनी डागडुजी केली. हा बवई कईलाह जिल्ह्याच्या दुसर्या अर्ध्या भागाचा अधिकारी होता.
१९
त्यांच्या शेजारी येशूआच्या पुत्र मिस्पाहचा अधिकारी एजेरने एका भागात जिथे तट वळसा घेतो व शस्त्रागाराकडे जाण्याची चढण लागते, तिथे डागडुजी केली.
२०
त्यांच्या शेजारी जक्काईचा पुत्र बारूख होता. त्याने कोटाच्या वळणापासून थेट मुख्य याजक एल्याशीबच्या घराच्या दारापर्यंत उत्साहाने डागडुजी केली.
२१
त्याच्या शेजारी हक्कोसचा पुत्र उरीयाहचा पुत्र मरेमोथने एल्याशीबाच्या घराच्या दारापासून शेवटापर्यंतचा कोटाचा भाग दुरुस्त केला.
२२
मग सभोवती राहणारे याजक आले व त्यांनीही पुढील दुरुस्ती केली.
२३
त्यांच्या शेजारी बिन्यामीन व हश्शूब यांनी आपल्या घरासमोरील भागाची दुरुस्ती केली. त्यांच्या शेजारी मासेयाहचा पुत्र, जो अनन्याहचा पुत्र अजर्याहाने आपल्या घराजवळ डागडुजी केली.
२४
त्यांच्या शेजारी हेनादादचा पुत्र बिन्नुईने अजर्याहच्या घरापासून कोपर्यापर्यंतच्या कोटाचा भाग बांधला.
२५
उजईचा पुत्र पलालने कोट कोपर्यापासून राजवाड्याच्या वरच्या माळाजवळील तुरुंगाच्या अंगणापर्यंत काम करून बुरुजाचीही डागडुजी केली. त्याच्या शेजारी पारोशाचा पुत्र पदायाहनेही डागडुजी केली.
२६
ओफेलमध्ये राहणार्या मंदिराच्या सेवकांनी पूर्वेकडील पाण्याच्या वेशीपर्यंत कोटाची दुरुस्ती केली आणि बुरुजाचा पुढे आलेला भागही दुरुस्त केला.
२७
तकोवा येथील लोकांनी मनोऱ्याच्या बुरुजाच्या समोर असलेला भाग आणि ओफेलाच्या तटापर्यंतचा भाग दुरुस्त केला.
Settings