मार्क ६:३८-५६
३८
ते म्हणाले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत? जा आणि पाहा.” जेव्हा त्यांनी शोधले तेव्हा त्यांना कळले व ते म्हणाले, “पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.”
३९
मग येशूंनी लोकांना गवतावर गटागटाने बसावयास सांगितले.
४०
त्याप्रमाणे लोक पन्नास आणि शंभर अशा गटांनी बसले.
४१
मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले आणि स्वर्गाकडे पाहून त्याबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरीचे तुकडे करून ते शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले आणि दोन मासळ्यांचेही असेच वाटप केले.
४२
ते सर्वजण जेवले आणि तृप्त झाले,
४३
आणि शिष्यांनी उरलेले भाकरीचे तुकडे व मासे गोळा केले त्यावेळी बारा टोपल्या उचलल्या.
४४
तिथे जेवणार्या पुरुषांची संख्या सुमारे पाच हजार होती.
४५
लगेच येशूंनी आपल्या शिष्यांना होडीत बसून पुढे बेथसैदास जाण्यास सांगितले आणि ते स्वतः लोकांना निरोप देण्यासाठी मागे राहिले.
४६
त्यांना निरोप दिल्यानंतर, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेले.
४७
रात्र झाली, तेव्हा होडी सरोवराच्या मध्यावर गेली होती आणि ते एकटेच जमिनीवर होते.
४८
तिथून त्यांनी आपल्या शिष्यांना वल्ही मारणे कठीण जात आहे असे पाहिले, कारण वारा त्यांच्याविरुद्ध दिशेने वाहत होता. पहाटेच्या सुमारास येशू पाण्यावरून चालत त्यांच्याकडे आले. ते त्यांना ओलांडून पुढे जाऊ लागले,
४९
परंतु त्यांनी येशूंना सरोवरावरून चालताना पाहिले, तेव्हा ते भूतच असले पाहिजे असे त्यांना वाटले व ते ओरडले,
५०
कारण त्या सर्वांनीच त्यांना पाहिले आणि ते फार घाबरले. पण ते त्यांना तत्काळ म्हणाले, “धीर धरा, मीच आहे. भिऊ नका.”
५१
मग ते त्यांच्याबरोबर होडीत चढले तेव्हा वादळ शांत झाले. शिष्य आश्चर्याने थक्क झाले.
५२
कारण भाकरी संबंधात त्यांना समजले नव्हते आणि त्यांची हृदये कठीण झाली होती.
५३
ते पलीकडे गेल्यावर गनेसरेत येथे उतरले व त्यांनी होडी तिथे लावली,
५४
ते होडीतून उतरले न उतरले तोच, लोकांनी येशूंना ओळखले;
५५
लोक त्या संपूर्ण परिसरात धावत गेले आणि ते जिथे कुठे आहे असे त्यांनी ऐकले तिथे आजारग्रस्त लोकांना अंथरुणावर घालून त्यांच्याकडे घेऊन गेले.
५६
आणि जिथे कुठेही येशू गेले—गावात, शहरात—बाजारपेठेत लोक आजार्यांना घेऊन जात आणि तुमच्या झग्याच्या काठाला तरी स्पर्श करू द्या अशी त्यांना विनंती करत आणि जितक्यांनी त्यांना स्पर्श केला तितके सर्व बरे झाले.
Settings