Skip to content
लूक १२:३५-४८

लूक १२:३५-४८

३५
“तुम्ही सेवेसाठी सज्ज व्हा व आपले दिवे जळत राहू द्या,
३६
अशा सेवकांसारखे असावे की, जे त्यांचा धनी लग्नाच्या मेजवानीवरून परत येईल म्हणून वाट पाहत आहेत, यासाठी की जेव्हा तो येतो आणि दार ठोठावतो त्याक्षणीच त्याच्यासाठी दार उघडावे.
३७
त्या सेवकांसाठी हे फारच चांगले असेल की, त्यांचा धनी येतो, तेव्हा ते जागे आहेत असे त्याला दिसून येते. मी तुम्हाला निश्चित सांगतो, तो धनी स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी वस्त्रे घालेल आणि त्यांना मेजाभोवती मागे टेकून बसावयास सांगेल आणि तो येईल आणि त्यांना जेवण वाढेल.
३८
तो मध्यरात्री येवो किंवा पहाटे, पण एवढे मात्र निश्चित की तो केव्हाही आला, तरी त्याची वाट पाहत तयारीत असणार्‍या सेवकांना फार मोठा आशीर्वाद प्राप्त होईल.
३९
पण एक गोष्ट नीट समजून घ्या की चोर केव्हा येणार ती घटका घरधन्याला आधी समजली असती, तर तो जागा राहिला असता आणि आपले घर फोडू दिले नसते.
४०
तुम्ही सदैव तयारीत राहा. कारण मानवपुत्र तुम्हाला कल्पना नसेल अशा घटकेला येईल.”
४१
पेत्राने विचारले, “प्रभूजी, तुम्ही हा दाखला आम्हाला उद्देशून सांगत आहात की सर्वांना?”
४२
यावर प्रभूजींनी उत्तर दिले, “प्रामाणिक व सुज्ञ कारभारी कोण आहे, ज्याच्यावर घरधनी त्याच्या सेवकांच्या अन्नाचे योग्य वेळी वाटप करण्याचे काम सोपवितो?
४३
धनी येईल, तेव्हा जो दास आपली कामगिरी बजावीत असताना त्याला आढळेल, तो धन्य होय.
४४
मी तुम्हाला निश्चित सांगतो की तो धनी आपल्या सर्व मालमत्तेवर त्याची नेमणूक करेल.
४५
परंतु जो सेवक आपल्या मनात म्हणेल, ‘माझा धनी येण्यास पुष्कळ विलंब होत आहे,’ आणि तो सोबतीच्या दासांना व दासींना मारहाण करू लागेल आणि पिणार्‍यांबरोबर खाऊ आणि पिऊ लागेल.
४६
तर त्या दासाचा धनी, तो अपेक्षा करीत नाही आणि तो सावध नाही अशा घटकेला येईल. तो त्या दासाचे तुकडे करेल व अविश्वासणार्‍यांबरोबर त्याला वाटा देईल.
४७
“मग त्या सेवकाला पुष्कळ फटके मारण्यात येतील, कारण धन्याची इच्छा माहीत असूनही त्याने तयारी केली नाही किंवा धन्याला जे पाहिजे ते केले नाही.
४८
परंतु ज्यांना माहीत नाही की त्यांनी शिक्षेस पात्र अशी कृत्ये केली आहेत त्यांना थोडेच फटके मारण्यात येतील. ज्या प्रत्येकाला भरपूर दिलेले आहे, त्याच्याकडून भरपूर मागणी केली जाईल आणि ज्याच्याकडे अधिक सोपविलेले आहे, त्याच्याकडून खूप अधिक मागण्यात येईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options