लूक ११:१६-२८
१६
दुसर्यांनी परीक्षा पाहण्याकरिता आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी केली.
१७
त्यांचे विचार येशूंना माहीत होते आणि ते त्यांना म्हणाले, “ज्या राज्यात फूट पडलेली आहे, त्या राज्याचा नाश होतो आणि आपसात फूट पडलेले घर कोसळून पडते.
१८
जर सैतानातच फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?” कारण तुम्ही असा दावा करता की मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो,
१९
आता मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? मग तेच तुमचे न्यायाधीश असतील.
२०
परंतु मी जर परमेश्वराच्या शक्तीने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.
२१
“जोपर्यंत एखादा बळकट मनुष्य, पूर्ण सशस्त्र होऊन आपल्या घराची रखवाली करतो, तोपर्यंत त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.
२२
पण एखादा अधिक बलवान येऊन त्याला जिंकतो व ज्या शस्त्रांवर त्याचा भरवसा होता ते काढून त्याची सर्व मालमत्ता लुटतो व वाटून देतो.
२३
“जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.
२४
“एखाद्या मनुष्यातून अशुद्ध आत्मा निघाला म्हणजे तो रुक्ष ठिकाणी विश्रांती घेण्यासाठी जागा शोधतो आणि ती त्याला सापडत नाही. त्यावेळी तो म्हणतो, ‘जे घर मी सोडले, तिथे परत जाईन.’
२५
तो परत आला म्हणजे त्याला ते घर झाडून स्वच्छ केलेले व व्यवस्थित ठेवलेले असे आढळते.
२६
नंतर तो जाऊन आपल्यापेक्षा अधिक दुष्ट असे आणखी सात दुरात्मे घेऊन येतो व ते आत जाऊन तिथे राहतात आणि मग त्या मनुष्याची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.”
२७
येशू बोलत असताना त्या गर्दीतील एक स्त्री ओरडून म्हणाली, “धन्य तुझी माता, जिने तुला जन्म दिला, दूध पाजले व तुझे पोषण केले!”
२८
त्याने उत्तर दिले, “परंतु जे परमेश्वराचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, ते अधिक धन्य आहेत.”
Settings