Skip to content
लूक ११:१४-२३

येशूवर बालजबुलाच्या साहाय्याने भुते काढल्याचा आरोप

लूक ११:१४-२३
१४
येशू एका मुक्या दुरात्म्याला काढत होते, तो दुरात्मा निघून गेल्यानंतर, त्या मुक्या मनुष्याला बोलता येऊ लागले. ते पाहून गर्दीतील लोक आश्चर्यचकित झाले.
१५
पण काहीजण म्हणाले, “हा बालजबूल, भुतांचा राजा सैतानाच्या साहाय्याने भुतांना घालवित असतो.”
१६
दुसर्‍यांनी परीक्षा पाहण्याकरिता आकाशातून चिन्ह दाखवा अशी मागणी केली.
१७
त्यांचे विचार येशूंना माहीत होते आणि ते त्यांना म्हणाले, “ज्या राज्यात फूट पडलेली आहे, त्या राज्याचा नाश होतो आणि आपसात फूट पडलेले घर कोसळून पडते.
१८
जर सैतानातच फूट पडली, तर त्याचे राज्य कसे टिकेल?” कारण तुम्ही असा दावा करता की मी बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो,
१९
आता मी जर बालजबूलच्या साहाय्याने भुते काढतो, तर तुमचे अनुयायी कोणाच्या साहाय्याने भुते काढतात? मग तेच तुमचे न्यायाधीश असतील.
२०
परंतु मी जर परमेश्वराच्या शक्तीने भुते काढतो, तर परमेश्वराचे राज्य तुमच्यावर आले आहे.
२१
“जोपर्यंत एखादा बळकट मनुष्य, पूर्ण सशस्त्र होऊन आपल्या घराची रखवाली करतो, तोपर्यंत त्याची मालमत्ता सुरक्षित राहते.
२२
पण एखादा अधिक बलवान येऊन त्याला जिंकतो व ज्या शस्त्रांवर त्याचा भरवसा होता ते काढून त्याची सर्व मालमत्ता लुटतो व वाटून देतो.
२३
“जो माझ्याबरोबर नाही तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो विखुरतो.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.

Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options