मुख्य मजकुरावर जा
शास्ते ७:१-८

सैन्याची संख्या कमी केली जाते

शास्ते ७:१-८
अगदी पहाटेस यरूब्बआल (म्हणजे गिदोन) आणि त्याचे सर्व लोक हरोदाच्या झर्‍यापर्यंत गेले. मिद्यान्यांचा तळ त्यांच्या उत्तरेस मोरेह डोंगराजवळ खोर्‍यात होता.
याहवेह गिदोनाला म्हणाले, “तुझ्याकडे खूप जास्त लोक आहेत. मी मिद्यानी लोकांना तुमच्या हातात देणार नाही; नाहीतर इस्राएलचे लोक माझ्यासमोर गर्व करून म्हणतील की, ‘आमच्याच बळाने आम्ही स्वतःला वाचविले आहे.’
आता सैन्यांना सूचना दे, ‘जर कोणी घाबरत असतील, तर त्यांनी गिलआद डोंगरावरून माघारी जावे.’ ” त्यामधून बावीस हजार लोक परत गेले व दहा हजार राहिले.
परंतु याहवेह गिदोनास म्हणाले, “अजूनही पुष्कळ लोक आहेत. त्यांना पाण्याजवळ घेऊन चल आणि तिथे मी त्यांना पारखून त्यांची संख्या तुझ्यासाठी कमी करेन. जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाईल,’ तो तुझ्याबरोबर जाईल; पण जर मी म्हणालो, ‘हा तुझ्याबरोबर जाऊ नये,’ तर त्याने तुझ्याबरोबर जाऊ नये.”
म्हणून गिदोनाने त्या माणसांना पाण्याजवळ नेले. तिथे याहवेहने त्याला सांगितले, “जे कुत्र्याप्रमाणे पाणी जिभेने पितात त्यांना जे गुडघे टेकून पाणी पितात त्यांच्यापासून वेगळे करा.”
त्यांच्यापैकी तीनशे जण होते जे पाणी आपल्या तोंडाजवळ घेऊन, कुत्र्यांसारखे चाटून पाणी प्याले. बाकी सर्व गुडघे टेकून पाणी प्याले.
याहवेहने गिदोनाला सांगितले, “जे चाटून पाणी प्याले, त्या तीनशे लोकांच्या साहाय्यानेच मी तुम्हाला सोडवेन आणि मिद्यानी लोकांना तुमच्या हाती देईन. बाकी सर्वांना तू घरी पाठवून दे.”
गिदोनाने बाकीच्या इस्राएली लोकांना घरी पाठवून दिले, परंतु त्याच्याजवळ फक्त तीनशे लोकच ठेवले, ज्यांनी इतरांकडून अन्नसामुग्री व रणशिंगे घेतली. त्याच्या खाली खोर्‍यात मिद्यानी लोक आपल्या छावणीत होते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options