यहोशुआ २४:१०-२०
१०
परंतु मी बलामाचे ऐकले नाही आणि त्याने तुम्हाला पुन्हा आणि पुन्हा आशीर्वाद दिला आणि मी तुम्हाला त्याच्या हातातून सोडविले.
११
“ ‘नंतर तुम्ही यार्देन नदी ओलांडून यरीहोकडे आला. यरीहोचे रहिवासी तुमच्याविरुद्ध लढले, तसेच अमोरी, परिज्जी, कनानी, हिथी, गिर्गाशी, हिव्वी आणि यबूसी हे सुद्धा लढले, परंतु मी त्यांना तुमच्या हाती दिले.
१२
मी तुमच्यापुढे गांधीलमाशा पाठविल्या व त्यांनी त्यांना व दोन अमोरी राजांना तुमच्यापुढून घालवून दिले. हे तुमच्या तलवारीने आणि धनुष्य बाणांनी केले नाही.
१३
म्हणून ज्या भूमीवर तुम्ही कष्ट केले नाहीत अशी भूमी आणि जी शहरे तुम्ही बांधली नाहीत ती मी तुम्हाला दिली; आणि तुम्ही त्यात राहता आणि जे तुम्ही लावले नाही त्या द्राक्षमळ्यातून व जैतुनाच्या बागेतून फळे खाता.’
१४
“तर आता याहवेहचे भय धरा आणि संपूर्ण विश्वासूपणाने त्यांची सेवा करा. तुमचे पूर्वज फरात नदीच्या पलीकडे आणि इजिप्तमध्ये राहत असताना ज्या देवतांची उपासना करीत होते, त्या टाकून द्या आणि याहवेहची सेवा करा.
१५
परंतु याहवेहची सेवा करणे तुम्हाला अप्रिय वाटत असेल, तर तुम्ही कोणाची सेवा करणार ते आजच ठरवा, फरात नदीच्या पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या दैवतांची सेवा केली ती की ज्या अमोरी लोकांच्या देशात तुम्ही राहता त्यांच्या दैवतांची? परंतु मी आणि माझे घराणे, आम्ही याहवेहची सेवा करणार.”
१६
तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “आम्ही आमच्या याहवेहचा त्याग करून इतर दैवतांची सेवा करणे असे आमच्या हातून कधी न घडो!
१७
याहवेह आमच्या परमेश्वरांनी आम्हाला व आमच्या पूर्वजांना इजिप्तमधून, त्या गुलामगिरीच्या देशातून बाहेर काढले आणि आमच्या डोळ्यांपुढे ते महान चमत्कार केले. आमच्या संपूर्ण प्रवासात आणि ज्या प्रदेशातून आम्ही प्रवास केला त्या सर्व प्रवासात आमचे संरक्षण केले.
१८
आणि याहवेहने जे अमोरी लोक त्या देशात राहत होते त्यांच्यासहित सर्व राष्ट्रांना आमच्या समोरून बाहेर घालवून दिले. आम्हीही याहवेहचीच सेवा करणार, कारण ते आमचे परमेश्वर आहेत.”
१९
यहोशुआ लोकांना म्हणाला, “तुमच्याने याहवेहची सेवा करविणार नाही. ते पवित्र परमेश्वर आहे; ते ईर्ष्यावान परमेश्वर आहेत. ते तुमच्या बंडाची आणि तुमच्या पातकांची क्षमा करणार नाही.
२०
जर तुम्ही याहवेहचा त्याग कराल आणि परदेशी दैवताची सेवा कराल, जरी इतका काळ ते तुमच्याबरोबर चांगले राहिले आहेत, तरी ते उलटून तुमच्यावर संकट आणून तुमचा अंत करतील.”
Settings